तिरंगा फडकविल्यास आरपीजी हल्ला करू
वृत्तसंस्था/ भटिंडा
शिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंन सिंह पन्नूने आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी दिली आहे. भटिंडात विविध ठिकाणी खलिस्तान जिंदाबाद अशा घोषणा पन्नूच्या हस्तकांनी लिहिल्या आहेत. 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकविण्यास आरपीजी हल्ला करू अशी धमकी पन्नूने मुख्यमंत्री मान यांना दिली आहे.
एसएफजेच्या गुरपतवंतने एक व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्री मान यांच्या नावाने धमकी जारी केली आहे. तसेच भटिंडातील ज्या ठिकाणी मुख्यमंत्री भगवंत मान हे ध्वजारोहण करणार आहेत, त्या मैदानाच्या संरक्षक भिंतीवर खलिस्तानी घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. याचबरोबर भटिंडातील सीआयएसएफ तळ, एनएफएल आणि एका विद्यापीठाबाहेरही देशविरोधी घोषणा लिहिल्या गेल्या आहेत.
मुख्यमंत्री मान यांनी 26 जानेवारी राजी ध्वजारोहण केले तर त्यांच्यावर आरपीजी हल्ला करू. जे हात घोषणा लिहू शकतात, ते आरपीजी वापरणे देखील जाणतात. याचमुळे तिरंगा फडकविण्यासाठी येऊ नका असे पन्नूने धमकी देत म्हटले आहे.
केंद्र आणि पंजाब सरकार यांच्यादरम्यान हिंदूंनी भरडले जाऊ नये. हिंदूंनी देखील 26 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमात येणे टाळावे, हा हल्ला त्यांच्यावरही होऊ शकतो असे दहशतवादी पन्नूने स्वतःच्या व्हिडिओत म्हटले आहे.









