वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याने कॉमेडियन कपिल शर्माला एक धमकी देणारा व्हिडीओ जारी केला आहे. पन्नूने एक व्हिडिओ संदेश जारी करत ‘कॅनडा तुमचे खेळाचे मैदान नाही. तुमचे कष्टाचे पैसे भारतात परत घेऊन जा.’ अशी उघड धमकी दिली आहे. त्यांनी कपिल शर्मावर हिंदुत्व विचारसरणी पसरवण्याचा आरोप केला. दरम्यान, कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा कॅनडा पोलीस तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात खलिस्तानी समर्थकांचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
कपिल शर्माने 4 जुलै रोजी ब्रिटिश कोलंबियाच्या सरे शहरात त्यांचे कॅफे उघडले. 10 जुलैच्या रात्री अज्ञात लोकांनी या कॅफेवर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी हरजीत सिंग लाडी आणि तुफान सिंग यांनी घेतली होती. हे दोघेहीजण बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (बीकेआय) संबंधित आहेत. कॅनडाच्या सरकारनेही ‘बीकेआय’ला दहशतवादी संघटना मानले आहे. हरजीत सिंग लाडी यांचाही भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू याला 2019 मध्ये भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. त्याची संघटना ‘एसएफजे’वर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत भारतात बंदी आहे. भारतात पन्नूविरुद्ध 104 गुन्हे दाखल असून त्यापैकी अनेक प्रकरणांची एनआयए आणि संबंधित राज्यांकडून चौकशी सुरू आहे. भारत सरकारला अस्थिर करणे आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये अशांतता निर्माण करणे हे पन्नू आणि एसएफजेचे उद्दिष्ट आहे.








