आयएसआय, बीकेआयशी संबंधित 13 दहशतवाद्यांना अटक
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलद्वारे (बीकेआय) परदेशातून चालवल्या जाणाऱ्या आयएसआय-समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या संयुक्त कारवाईअंतर्गत फ्रान्स, ग्रीस आणि पाकिस्तानमधील आयएसआय समर्थित बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहे. दोन्ही मॉड्यूलमधील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 आरपीजी (लाँचरसह), 2 आयईडी (प्रत्येकी 2.5 किलो), 2 किलो आरडीएक्स (रिमोट कंट्रोल), 2 ग्रेनेड डेटोनेटर्ससह, 5 पिस्तूल (बेरेटा आणि ग्लॉक), 44 जिवंत काडतुसे, वायरलेस सेट आणि 3 वाहने जप्त केली आहेत.
चार दिवस चाललेल्या पंजाब पोलिसांच्या कारवाईत दोन दहशतवादी मॉड्यूलचा नाश करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीनासह जतिंदर उर्फ हनी, जगजीत उर्फ जग्गा (कपूरथळा), हरप्रीत आणि जगरूप (होशियारपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध अमृतसर एसएसओसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे समजते. या कारवाईबाबत बोलताना पंजाबच्या डीजीपींनी कोणता दहशतवादी कोणत्या मॉड्यूलशी संबंधित होता हेदेखील सांगितले. पहिल्या मॉड्यूलमध्ये फ्रान्सस्थित बीकेआयचा दुवा समोर आला आहे. यामध्ये होशियारपूर येथील मास्टरमाइंड सतनाम सिंग उर्फ सत्ता नौशेरा येथील रहिवासी याचे नाव समाविष्ट आहे.
फ्रान्समध्ये बसलेला सूत्रधार आपल्या गुंडांच्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या साथीदारांकडून पोलिसांनी एक लोडेड आरपीजी, 2 आयईडी (प्रत्येकी 2.5 किलो), डिटोनेटर्ससह 2 ग्रेनेड, 2 किलो आरडीएक्स (रिमोट-कंट्रोल्ड), 3 पिस्तूल, 6 मॅगझिन, 34 जिवंत राउंड, 1 वायरलेस सेट आणि इतर वस्तू जप्त केल्या.
कारवाई करण्यात आलेले दुसरे मॉड्यूल ग्रीस आणि पाकिस्तानशी जोडलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसरे मॉड्यूल ग्रीस आणि पाकिस्तानमधील दहशतवादी चालवत आहेत. त्याच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले सर्वात प्रमुख सूत्रधार म्हणजे गुरुदासपूरचा रहिवासी जसविंदर उर्फ मन्नू अग्वान (ग्रीसमध्ये लपलेला) आणि पाकिस्तानस्थित हरविंदर रिंडा यांचे नाव समाविष्ट आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण 9 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 आरपीजी लाँचर, 2 पिस्तूल (बेरेटा आणि ग्लॉक), 10 काडतुसे, 3 वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी अधिक सखोल तपास केला जात आहे.









