अफगाणिस्तानातून कराचीत हलविले : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख भारतासाठी ‘मोस्ट वॉन्टेड’
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला हृदयविकाराचा झटका आला आहे. मसूद अझहर हा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. येथेच त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी पाकिस्तानात आणण्यात आले. दहशतवादी मौलाना मसूद अझहर याला खोस्त प्रांतातील गोर्बज भागातून एका विशेष रुग्णवाहिकेतून पाकिस्तानात आणण्यात आल्याचे समजते. तो सध्या कराचीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल असून कडेकोट सुरक्षेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मसूदला कराचीतून रावळपिंडी किंवा इस्लामाबादमधील मोठ्या रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहर हा संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेला दहशतवादी असून तो भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानला जातो. मसूदला पडद्यामागे पाठिंबा दिल्याचा आरोप पाकिस्तान सरकार आणि लष्करावर होत आहे. मसूदला पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय मिळाल्याचा मुद्दा भारताने विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेकदा मांडला आहे. अझहर काही दिवसांपूर्वीच चर्चेत आला, जेव्हा तो पाकिस्तानातील बहावलपूर येथे एका जाहीर सभेत भाषण करताना दिसला. या सभेतही त्याने भारताविरोधात अनेक वक्तव्ये केली होती.
भारतातील हल्ल्यांमध्ये मसूदचा हात
2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा अझहर याला त्याच वर्षी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर 2022 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी अझहर अफगाणिस्तानात पळून गेल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही मसूद पाकिस्तानमधूनच आपल्या कारवाया करत असल्याचे दिसून आले होते. 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचाही आरोपही मसूदवर आहे. तसेच अन्य हल्ल्यांसाठीही त्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित केल्याचा आरोप









