एसएफजे आणि केटीएफने स्वीकारली जबाबदारी : बदला घेतल्याचा दावा
वृत्तसंस्था/ भटिंडा
पंजाबमधील भटिंडा लष्करी छावणीवर गोळीबार करून 4 जवानांना ठार केल्याप्रकरणी हल्लेखोरांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. याचदरम्यान याप्रकरणी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेचीही एंट्री झाली आहे. तसेच खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेने भटिंडा आर्मी पॅम्पमधील गोळीबाराची जबाबदारीही घेतली आहे. या दोन्ही संघटनांच्या दाव्यामुळे ही घटनेमागे दहशतवादी संघटनांचा सहभाग तपासला जात आहे.
शीख फॉर जस्टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत पन्नू याने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. पंजाबला वेगळा देश खलिस्तान बनवा, अन्यथा भविष्यात असे हल्ले होत राहतील, असा व्हिडीओ दहशतवादी पन्नूने जारी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना इशारा दिला आहे. तसेच खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेने भटिंडा आर्मी पॅम्पमधील गोळीबाराची जबाबदारीही घेतली आहे. केटीएफचे अजित सिंग यांनी लेटर-पॅडवर एक पत्र जारी केले आहे. शिखांच्या हत्याकांडासाठी भारतीय सैन्य जबाबदार आहे. 1984 मध्ये भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरावरही हल्ला केला होता. त्यांनी या हल्ल्याचा बदला घेतल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. केटीएफ आणि एसएफजे यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती तपासाशी संबंधित भटिंडा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दिल्लीतून विशेष पथक दाखल
भटिंडा लष्करी तळावरील हल्ल्याचा तपास सध्या लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्तपणे केला जात आहे. लष्कर आणि पोलिसांनी दोन संशयित हल्लेखोरांची नावे सांगितली होती, परंतु अद्याप त्यांना पकडण्याची औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून लष्करी अधिकाऱ्यांचे पथक भटिंडातील छावणीमध्ये पोहोचले आहे. दिल्लीहून पोहोचलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे पथक या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. गोळीबार करून हल्लेखोर कोणत्या दिशेला पळून गेले असावेत हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळाची वारंवार तपासणी केली जात आहे.
वेगवेगळ्या कोनातून तपास
पोलीस आणि लष्कराच्या तपासात गोळीबार करणारे लोक छावणीतीलच असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर लष्करी अधिकारी आणि पोलीस दल छावणीत तैनात असलेल्या विविध रेजिमेंट आणि बटालियनमधील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची सतत चौकशी करत आहेत. तसेच लष्कराचे अधिकारीही परस्पर शत्रुत्व मानून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हुतात्मा जवानांचे अलीकडेच कोणासोबत भांडण झाले होते का, याचा शोध लष्करी अधिकारी घेत आहेत. त्याचबरोबर घटनेच्या दोन दिवस आधी बेपत्ता झालेली रायफल कोणी नेली याचा शोध लष्करी अधिकारी घेत आहेत.









