दूतावासावरील ध्वजाचा केला होता अपमान : केएलएफच्या लंडन शाखेचा प्रमुख
वृत्तसंस्था /लंडन
वारिस पंजाब दे या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहचा हँडलर आणि ब्रिटनमधील भारतीय दूतावासावरील ध्वजाचा अपमान करणारा दहशतवादी अवतार सिंह खांडाचा मृत्यू झाला आहे. लंडनमधील रुग्णालयादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. खांडाला रक्ताचा कर्करोग झाला होता, तसेच त्याच्या शरीरात विष फैलावले होते. प्रकृती बिघडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करविण्यात आले होते. ब्रिटनमध्ये मागील काही काळापासून खलिस्तानसंबंधी होणाऱ्या कारवाया दहशतवादी अवतार सिंह खांडाकडूनच घडविल्या जात होत्या. मागील काही काळापासून खांडा अत्यंत सक्रीय होता. खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या (केएलएफ)च्या लंडन शाखेचा तो प्रमुख होता. केएलएफचा दहशतवादी कुलवंत सिंह खुकरानाचा तो पुत्र होता. खलिस्तान समर्थक संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न खांडाकडून सुरू होता. अमृतपाल सिंहला प्रशिक्षित करत पंजाबमध्ये सक्रीय करण्यासाठी खांडाने शिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूसोबत हातमिळवणी केली होती. ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपालचा हँडलर अवतार सिंह खांडाच होता. पंजाब पोलिसांनी अमृतपाल विरोधात कारवाई सुरू केल्यावर 37 दिवसांपर्यंत तो केवळ खांडाच्या मदतीमुळेच लपून राहू शकला होता. खांडाने याकरता स्वत:च्या स्लीपर सेल्सची मदत अमृतपालला पुरविली होती.
वादग्रस्त पार्श्वभूमी
अवतार सिंह खांडा हा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी होता. खांडाचे वडिल खलिस्तानी कारवायांशी संबंधित असल्याने त्यांच्या घरी सुरक्षा यंत्रणा वारंवार चौकशीसाठी येत होत्या. याचमुळे खांडाचे कुटुंब पतियाळा, लुधियाना तसेच मोगा येथे स्थलांतरित झाले होते. 1988 मध्ये खांडाचे काका बलवंत सिंह खुकराना हे सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत मारले गेले होते. तर 1991 मध्ये खांडाचे वडिल कुलवंत सिंह खुकरानाला देखील चकमकीत कंठस्नान घातले गेले होते. अवतारचे वडिल अन् काका दोघेही खलिस्तानी फोर्सचे सक्रीय सदस्य होते. अवतारचे मामा गुरजंत सिंह बुधसिंहवाला हे खलिस्तान लिबरेशन फोर्सचे प्रमुख होते. खांडा हा वयाच्या 22 व्या वर्षी शिक्षणासाठी लंडन येथे पोहोचला होता. तेथेच तो खलिस्तानींच्या संपर्कात आला आणि मग खलिस्तानी संघटनांचा सक्रीय सदस्य झाला. 2015 मध्ये भारत सरकारने ब्रिटिश सरकारला काही भारतविरोधी लोकांची नावे सोपविली होती. यात खांडाचे नाव सामील होते. खांडा हा देशद्रोही असून तरुणांना उग्रवादाचे प्रशिक्षण देत असल्याचे भारताने म्हटले होते.
भारताकडून दहशतवादी घोषित
विदेशात राहून खलिस्तानी कारवाया करणाऱ्या खांडाने भारतीय दूतावासावर फडकत असलेल्या तिरंग्याचा अपमान केला होता. खांडाच अमृतपाल सिंहचा हँडलर असल्याचे एनआयएच्या चौकशीतून स्पष्ट झाले होते. अवतार सिंह खांडा हा खलिस्तानी दहशतवादी जगतार सिंह तारा आणि परमजीत सिंह पम्माचा अत्यंत निकटवर्तीय होता. पम्मा हा खलिस्तान टायगर फोर्सचा सक्रीय सदस्य असून एनआयएच्या यादीतील तो मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.









