सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
सुरक्षा दलांनी श्रीनगरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत मोठे यश प्राप्त केले आहे. 20 ऑक्टोबर रोजी गगनगीर येथे भुयार प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सामील वाँटेड दहशतवाद्याला सुरक्षादलांनी यमसदनी पाठविले आहे. मृत दहशतवाद्याचे नाव जुनैद रमजान भट असून तो श्रीनगरच्या हारवन येथील भागात झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. चकमक स्थळावरून एम4 युएस निर्मित कार्बाइन हस्तगत करण्यात आली आहे.
20 ऑक्टोबर रोजी गगनगीर सोनमर्गमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांना जीव गमवावा लागला होता. दोन दहशतवाद्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी हल्ला केला होता. दोन्ही दहशतवाद्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते, यामुळे त्यांची ओळख पटू शकली होती. चकमकीत मारला गेलेला जुनैद रमजान भट हा कुलगाम भागातील लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक कमांडर असून मागील काही वर्षांपासून तो सक्रिय होता.
गांदरबलच्या सोनमर्ग भागात भुयार प्रकल्पावर काम करत असलेल्या खासगी कंपनीच्या कामगारांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 6 कामगार आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील दहशतवादी समूह लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री विशेष गुप्तचर माहितीच्या आधारावर दाचीगाम जंगलाच्या क्षेत्रांमध्ये शोधमोहीम हाती घेतली होती. प्रारंभिक गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला, तर दुसऱ्या दहशतवाद्याने घनदाट जंगलाचा लाभ घेत पलायन केले आहे. मध्य काश्मीरच्या गांदरबल आणि उत्तर काश्मीरच्या बांदीपोराला जोडणाऱ्या जबरवान पर्वतीय क्षेत्रात सुरक्षा दलांनी सातत्याने दहशतवाद्यांचा शोध चालविला आहे.









