जयपूर साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोपी
वृत्तसंस्था/ रतलाम
जयपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचणारा आणि सुमारे तीन वर्षांपासून फरार असलेल्या फिरोज खानला पोलिसांनी बुधवारी मध्यप्रदेशच्या रतलाम येथे अटक केली आहे. फिरोजवर एनआयएने 5 लाख रुपयांचे इनाम घोषित केले होते. ईदनिमित्त तो रतलाम येथे आल्याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
30 मार्च 2022 रोजी राजस्थानच्या निंबाहेडामध्ये पोलिसांनी 12 किलो स्फोटक सामग्रीसह अल्तमस आणि सरफुद्दीन यांना अटक केली होती. यानंतर सात अन्य आरोपींना विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी हे कट्टरवादी संघटना अल सुफा ग्रूपशी संबंधित होते. यापूर्वी अटक करण्यात आलेले 10 आरोपी जयपूरच्या तुरुंगात कैद असून त्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे. तर याप्रकरणी आरोपी असलेला फिरोज फरार झाल्याने एनआयएने त्याच्या विरोधात 5 लाख रुपयांचे इनाम घोषित केले हेते. फिरोज खानच्या शोधात पोलिसांनी रतलाम आणि अन्य ठिकाणी अनेकदा कारवाई केली होती, परंतु त्याला पकडण्यास यश आले नव्हते.
याचदरम्यान फिरोज रतलाम येथे आला असल्याची माहिती बुधवारी सकाळी पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार टीमने त्याला त्याच्या नातेवाईकाच्या घरातून अटक केली आहे.









