पाकिस्तानच्या कारनाम्यांविरोधात भारताचा मोठा निर्णय : कठोर इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधीची घोषणा झाली असली तरी पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारताने मोठा निर्णय जाहीर केला आहे. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरूच असल्यामुळे भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात भारताविरुद्धची कोणतीही दहशतवादी कारवाई युद्ध समजली जाईल. तसेच त्याचे उत्तरदेखील त्याच पद्धतीने दिले जाईल, असा सज्जड दम पाकिस्तानला भरला आहे.
गेल्या चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. पाकिस्तान भारतावरही वेगाने हल्ला करत आहे. नियंत्रण रेषेवरील तणावही वाढत चालला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानकडून हल्ले सुरूच राहिले तर त्या हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणाही भारताकडून करण्यात आली आहे. आता दहशतवादाविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही. भविष्यात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाया भारताविरुद्धचे युद्ध मानली जाईल. आणि या प्रकारच्या क्रियाकलापांना देखील त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला जाईल, असे भारत सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आदी उपस्थित होते. यावेळी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती तयार करण्यावरही चर्चा झाली.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून सतत चिथावणीखोर कारवाया केल्या जात आहेत. ते सीमावर्ती भागात सतत जोरदार गोळीबार, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत असून ते भारतीय सैन्याकडून हाणून पाडले जात आहेत. आपले सर्व प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे पाहून पाकिस्तान निराश झाला आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानने अणुबॉम्बच्या वापरावर निर्णय घेणाऱ्या समितीची बैठक पुढे ढकलली. एवढेच नाही तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताने आणखी हल्ले केले नाहीत तर आपला देश तणाव कमी करण्याचा विचार करण्यास तयार आहे, असे जाहीर केले. याचदरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत भारतीय सैन्याने प्रत्युत्तराच्या कारवाईची संपूर्ण माहिती दिली.
पाकिस्तानकडून सतत हल्ले : भारत
पाकिस्तान आपल्यावर सतत हल्ले करत असल्याचे शनिवारी भारताने म्हटले होते. भारताने ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रs आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून पश्चिम सीमेवर पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवाया उधळून लावल्या आहेत. की पाकिस्तान सीमावर्ती भागात आपले सैन्य तैनात करत आहे, जे परिस्थिती आणखी तणावपूर्ण करण्याचा त्यांचा आक्रमक हेतू दर्शवते, असेही भारतीय लष्कराने म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संबंध अधिकच बिघडले
गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. पर्यटकांना मारण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे आणि धर्म याबद्दल माहिती मिळवली होती. नंतर त्याला गोळी घालण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात खूप संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानच्या या कुरापतीनंतरच भारताने दहशतवादी संघटना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी कंबर कसली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 व्या दिवशी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी हल्ला करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि अनेक दहशतवादी कमांडर्स मारले गेले. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेमुळे शेजारच्या देशाचा प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यात लष्कराला यश आले. गेल्या चार दशकांपासून भारत दहशतवादी घटनांनी त्रस्त आहे आणि आता भारताने त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.









