आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोहीम
वृत्तसंस्था/पुरी
ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिरात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी मिळाली आहे. ओडिया भाषेत लिहिण्यात आलेले हे धमकीवजा पोस्टर मां बुढी ठाकुराणी मंदिराच्या भिंतीवर आढळून आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भिंतीवर मिळालेल्या एका पोस्टरमध्ये ‘दहशतवादी श्रीमंदिराला ध्वस्त करतील, मला बोलवा, अन्यथा विनाश होईल’ असे नमूद होते. मंदिराच्या भिंतीवर अनेक फोन क्रमांकही लिहिण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी, दिल्ली सारखे शब्द लिहिले गेले आहेत. आम्ही याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आम्हाला काही माहिती मिळाली असून अशाप्रकारची धमकी देणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकांची स्थापना केली जात असल्याची माहिती घटनास्थळाचा दौरा करणारे पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे.
परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात आहे. धमकीचे पोस्टर मंगळवारी रात्री भिंतीवर चिकटविण्यात आल्याचा अनुमान आहे. या धमकीमागील उद्देशही जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांची संख्याही वाढविण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. 12 व्या शतकातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे हिंदूधर्मीयांसाठी प्रमुख तीर्थस्थळ आहे. पुरीमध्ये असलेले हे जगप्रसिद्ध मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक जगभरातून दर्शनासाठी येत असतात.









