चालत्या ऑटोतून फेकले हँडग्रेनेड : खलिस्तानवाद्यांनी स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/चंदीगड
पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गुरुदासपूर जिह्यातील पोलीस चौकीवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. ऑटोमधून आलेल्या दहशतवाद्यांनी चौकीवर हँडग्रेनेड फेकून पलायन केले आहे. कलानौर शहरातील बक्षीवाल चौकीत ही घटना घडली. या स्फोटानंतर पोलीस अधिकारी, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी संघटना खलिस्तान जिंदाबाद फोर्सने (केजेएफ) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संदर्भातील एक पोस्ट ‘केजेएफ’ने सोशल मीडियावर टाकली आहे.
संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने विविध पथके रवाना केली आहेत. मात्र, हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत. फॉरेन्सिक तज्ञ आणि बॉम्ब निकामी पथकानेही तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्फोटाच्या ठिकाणाहून पुरावेही गोळा केले आहेत. दहशतवाद्यांनी वापरलेली ऑटो पोलिसांनी जप्त केली आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पंजाबमधील पोलीस चौकीवर गेल्या 26 दिवसांतील हा सातवा हल्ला आहे. या सर्व हल्ल्यांची जबाबदारी खलिस्तानी संघटनांनी स्वीकारली आहे. आतापर्यंत सहा स्फोट घडवण्यात संशयितांना यश आले, मात्र स्फोटापूर्वी अजनाळा पोलीस ठाण्यात एक बॉम्ब जप्त करण्यात आला.
खलिस्तानींचे कृत्य
खलिस्तान जिंदाबाद फोर्सने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 18 डिसेंबर 2024 च्या रात्री कलानौर पोलीस स्टेशनच्या बक्षीवाल चौकीत स्फोट घडवून आणण्यात आला. त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. जथेदार भाई रणजीत सिंह जम्मू यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईचे पर्यवेक्षण भाई जसविंदर सिंग बागी उर्फ मनू आगवान यांनी केले. पंजाबमध्ये शिखांबद्दल खोटा प्रचार केला जात आहे. पंजाबला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा खलिस्तानींनी दिला आहे.









