अनंतनाग येथे गोळीबार : जखमी तरूण राजेवाडी, दुधोंडी येथील: दोघांची प्रकृती स्थीर: गलाई-सराफ व्यवसायिकात घबराहट
आटपाडी प्रतिनिधी
अनंतनाग (काश्मीर) येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राजेवाडी (ता.आटपाडी) आणि दुधोंडी (ता.पलुस) येथील दोन तरूण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. गोळीबारात जखमी झालेले तरूण सराफ-गलाई कामगार म्हणून काम करतात. तरूणांवर झालेल्या हल्ल्यामुळे आटपाडी व पलुस तालुक्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे अक्षय कांता पाटोळे (21 रा.राजेवाडी) आणि सौरभ प्रदीप नलवडे (21 रा.दुधोंडी ता.पलुस) अशी आहेत. त्यांच्यावर अनंतनाग येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक भुमिपुत्र गलाई, सराफ व्यवसाय निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात वास्तव्यास आहेत. आटपाडी तालुक्यातील गलाई-सराफ बांधवांची संख्या मोठी आहे. अक्षय दिघंची येथील संतोष बुधावले या मामाकडे अनंतनाग (काश्मीर) येथे लाल चौक परिसरात गत एक वर्षापासून कामासाठी वास्तव्यास आहे.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अक्षय मित्र सौरभ सोबत व्यायामासाठी जात होते. वाटेत दहशतवाद्यांनी दोघांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. अक्षयच्या हाताला गोळी लागली असून सौरभच्या पोटाला गोळी घासून गेली आहे. दोन्ही तरूणांच्या जीवाचा धोका टळला आहे.
काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या हल्ल्यात अक्षय पाटोळे व सौरभ नलवडे जखमी झाल्याची माहिती बुधवारी कुटुंबियांना समजली. अधिकृत आणि पुर्ण माहिती मिळत नसल्याने दोन्ही कुटुंबे भयग्रस्त झाली होती. दुपारनंतर जखमींशी बोलणे झाल्यानंतर पाटोळे व नलवडे कुटुंबीयांना दिलासा मिळाला. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनीही याबाबत स्थानिक माहिती मिळविली. तर माजी मंत्री रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही जखमींच्या प्रकृतीची विचारपुस केली. आटपाडी तालुक्यातील अन्य गलाई-सराफ व्यवसायिकांनीही घटनास्थळी धाव घेत अनंतनाग येथील हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. दोघांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.
परराज्यातील लोकांवर हल्ले वाढले
जम्मु-काश्मीर येथे दहशतवादी कारवाया नेहमीच चर्चेत असतात. परंतू परराज्यातून आलेल्या लोकांवर हल्ले वाढत आहेत. आठवड्यातील परराज्यातील लोकांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. 13 जुलै रोजी शोपियाँ येथे झालेल्या हल्ल्यात बिहारमधील 3 मजुरांवर गोळीबार झाला होता. जम्मु-काश्मीर येथे असलेल्या गलाई-सराफ व्यवसायिकांसह नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.








