टार्गेट किलिंगची भीती, सीमेवर सुरक्षा वाढवली; दहशत पसरवण्याचा आयएसआयचा कट
चंदीगढ / वृत्तसंस्था
देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी पंजाब पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. टार्गेट किलिंगची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या इशाऱयानंतर सतर्कता बाळगत इतर राज्यातून पंजाबकडे येणाऱया मार्गांवर तपासणी नाके वाढवण्यात आले आहेत. रस्त्यांवरील संशयास्पद वाहनांची तपासणीही कसून केली जात आहे.
पंजाब पोलिसांना गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अलर्टनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी नवीन रणनीती तयार केली आहे. शीख दहशतवादी संघटनांच्या मदतीने टार्गेट किलिंगचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यानंतर पंजाब पोलिसांनी जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि राजस्थानमधून येणाऱया मार्गांवर सतर्कता वाढवली आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हरियाणा पोलिसांना अलर्टही पाठवला होता.
आमिष दाखवून तरुणांना भुरळ घालण्याचा प्रयत्न
दहशतवादी संघटना पंजाब आणि हरियाणातील तरुणांना आमिष दाखवत संघटनेत सामील करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यांना विदेशात स्थायिक होण्याचे आणि आलिशान जीवनासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले जात आहे. जम्मू काश्मीरपाठोपाठ आता पंजाबमध्येही दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने तरुणांना टार्गेट किलिंगसाठी भडकवले जात आहे.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांदरम्यान हिंदूंना मदत करणाऱया किंवा मोठय़ा पदावर बसलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. असेच प्रकार आता आयएसआय पंजाबमध्ये लागू करण्याचा विचार करत आहे.









