सिक्रेट किलर’ने भारताच्या आणखी एका शत्रूला संपविले
► वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी एलईटीचा प्रमुख दहशतवादी अब्दुल वाहिद कुंभोची हत्या केली आहे. तर भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला खालिदची काही दिवसांपूर्वी सिंध प्रांतातच हत्या करण्यात आली होती.
एका मागोमाग एक अनेक साथीदार मारले गेल्याने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या अनेक हिस्स्यामंध्ये लष्कर-ए-तोयबाचे अनेक दहशतवादी अज्ञातांच्या हल्ल्यात मारले गेले आहेत.
सैफुल्ला खालिदने भारतात अनेक मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. सैफुल्ला अलिकडेच नेपाळमधून पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्थायिक झाला होता. त्याला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षा पुरविण्यात आली होती. तर अब्दुल वाहिद स्वत:ला एक सामाजिक कार्यकर्त्याच्या स्वरुपात सादर करत होता. लष्कर-ए-तोयबाची राजकीय आघाडी मिल्ली मुस्लीम लीगचा तो सदस्य होता. सिंध प्रांताच्या बादिन जिल्ह्याच्या मतली भागात अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल वाहिदचा खात्मा केला आहे.
सिंध देश क्रांती सेना या सिंध राष्ट्रवादी संघटनेचे सदस्य गुलाम शब्बीर आणि रफाकत यांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. सिंध देश क्रांति सेना एक सिंधी राष्ट्रवादी संघटना असून प्रांताच्या अनेक हिस्स्यांमध्ये याचा मोठा प्रभाव आहे. संघटनेचे काही सदस्य बलूच लिबरेशन आर्मीशीही जोडले गेले आहेत.









