लष्कर-ए-तोयबाच्या फंडिंग नेटवर्कची होती जबाबदारी
वृत्तसंस्था/ लाहोर
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या फंडिंग नेटवर्कला खिदमत ए खलक नावाच्या संस्थेद्वारे सांभाळणारा दहशतवादी अब्दुल अजीजचा पाकिस्तानच्या बहावलपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज हा लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी कमांडर अमीर सैफुल्लाह कसूरीचा निकटवर्तीय होता.
अब्दुल अजीजने 2020 पर्यंत लष्कर-ए-तोयबासाठी निधी जमविला आणि भारताच्या विरोधात कारवायांसाठी तो वापरला गेला होता. लष्कर-ए-तोयबाने फलाह-ए-इन्सानियतवर बंदी घालण्यात आल्यावर खिदमत ए खलक नावाची संस्था निर्माण केली होती. याचा प्रमुख अब्दुल अजीजला करण्यात आले होते. बहावलपूर येथूनच लष्कर-ए-तोयबाला दरवर्षी 20 कोटी पाकिस्तानी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळत होती. ही रक्कम एकत्र करण्याची पूर्ण जबाबदारी अब्दुल अजीजच पार पाडत होता. अब्दुल अजीज हा लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाकरता खास होता. याचमुळे अब्दुल अजीज रुग्णालयात उपचार घेत असताना अनेक वरिष्ठ दहशतवाद्यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली होती.









