ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कोंढवा परिसरातील ब्यू बेल शाळेत मुस्लीम तरुणांना कट्टर बनविण्यासाठी पीएफआय संघटनेकडून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या शाळेवर कारवाई करत शाळेचे दोन मजले सील केले आहेत. तसेच या शाळेत 24 तास पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
या शाळेत पीएफआय मुस्लीम तरुणांना भरती करत होते. या तरुणांना कट्टर बनविण्यासाठी शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले होते. 2047 पर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी शसस्त्र व निशस्त्र प्रशिक्षण या मुलांना देण्यात येत असल्याचा दावा एनआयएने केला आहे.
मागील वर्षी 22 सप्टेंबरला एनआयएने पुण्यातील शाळेतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती. तसेच येथील कागदपत्रे जप्त केली होती. त्या कागदपत्रांच्या मजकुरातील अभ्यास केल्यानंतर पीएफआय मुस्लीम तरूणांना शस्त्राचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले. त्यानंतर एनआयएने ही कारवाई केली. त्यांच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांची हत्या घडवून आणण्याचा कटही पीएफआय रचत असल्याचा दावा एनआएने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.









