हैद्राबाद येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
हैद्राबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील फुटीरतावाद आणि देशभरातील माओवादी हिंसाचार नियंत्रणात आला आहे. या तिन्ही देशविघातक शक्तींना कहय़ात ठेवण्याचे सामर्थ्य या सरकारने दाखवले असून या पूर्वीच्या केंद्र सरकारांना ही कामगिरी करुन दाखविता आली नव्हती, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीने आयोजित केलेल्या आयपीएस अधिकाऱयांच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
सर्व आयपीएस पोलीस अधिकाऱयांसमोर आज नव्या काळातील आव्हाने उभी आहेत. त्यांना नवनव्या गुन्हय़ांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे पूर्वनियोजित पद्धतीने पसरविण्यात आलेली दिशाभूल करणारी माहिती, अपप्रचार युद्ध, निंदानालस्तीचा प्रसार आदी आव्हाने त्यांच्यासमोर नव्याने उभी राहिली आहेत. या सर्व संकटांना बहुआयामी आणि बहुपेडी पद्धतीने नियंत्रणात आणावे लागणार आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
पीएफआयवरील बंदीचे उदाहरण
इस्लामी संघटना पॉप्युल प्रंट ऑफ इंडियावर देशव्यापी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे क्रियान्वयन देशभरात एकाच वेळी करण्यात आले. विविध राज्यांमधील आयपीएस अधिकाऱयांनी यावेळी परस्पर सहयोगाचे आणि एकत्रित प्रयत्नांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. राज्यस्तरीय आणि केंद्रीय अशा सर्व सुरक्षा यंत्रणांनी देशाची लोकशाही बळकट राखण्यासाठी यावेळी उत्तम समन्वयाच्या आधाराने कार्य केले, अशी भलावण त्यांनी केली.
166 अधिकारी सेवेत येणार
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शहा उपस्थित होते. या कार्यक्रमात 166 प्रशिक्षणार्थींना आयपीएस अधिकारी पद प्रदान करण्यात आले. त्यांचे शानदार संचलनही झाले. भारताने आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा दिन नुकताच साजरा केला असल्याच्या काळात हा दिक्षांत कार्यक्रम होत आहे. याचाही उल्लेख त्यांनी केला. या दीक्षांत कार्यक्रमातील अधिकाऱयांची पार्श्वभूमी तंत्रवैज्ञानिक आहे. त्यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने केल्या जाणाऱया गुन्हय़ांच्या संशोधनामध्ये होणार आहे, हा महत्वाचा मुद्दा शहा यांनी मांडला.
2047 पर्यंत विकसीत होणार
2047 या वर्षात भारत आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहे. तोवेळपर्यंत आपला देश एक विकसीत देश झालेला असेल. त्यावेळी भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन कोणताही देश महासत्ता होऊ शकत नाही. त्यामुळे भारताला विकसीत राष्ट्र आणि महासत्ता करण्यात पोलीस अधिकाऱयांना महत्वाचे आणि निर्णायक योगदान द्यावे लागणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









