वॉशिंग्टन :
अमेरिकेने उजव्या विचारसरणीशी संबंधित ऑनलाइन नेटवर्क ‘टेररग्राम’ला दहशतवादी संघटना घोषित करत त्याच्यावर बंदी घातली आहे. तसेच देशात श्वेतवर्णीयांचे वर्चस्व वाढविण्यासाठी हिंसक कारवाया घडवून आणण्याचा आरोप केला आहे. या संघटनेला आणि याच्या तीन नेत्यांना विशेष स्वरुपात जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. या संघटनेच्या कुठल्याही प्रकारच्या संपत्तीला गोठविण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. ही संघटना मुख्यत्वे टेलिग्राम सोशल मीडिया साइटवर स्वत:च्या कारवाया संचालित करते. या संघटनेने हल्ल्यांसाठी मदत उपलब्ध केली आहे. यात 2022 मध्ये स्लोवाकियामध्ये एका बारबाहेर गोळीबार, 2024 मध्ये न्यूजर्सीमध्ये ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला आणि ऑगस्ट महिन्यात तुर्कियेत एका मशिदीतील चाकू हल्ला सामील असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने म्हटले. ही संघटना हिंसक श्वेत वर्चस्ववादाला प्रोत्साहन देते, कथित विरोधकांवर हल्ले घडवून आणू इच्छिते आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्यांसाठी सर्वप्रकारची मदत प्रदान करत असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेत असलेल्या या समुहाच्या सर्व संपत्ती जप्त केल्या जाणार आहेत. तसेच कुठलाही अमेरिकन नागरिक या समुहासोबत देवाणघेवाण करू शकणार नाही. संघटनेतील तीन नेत्यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले असून ते सध्या ब्राझील, क्रोएशिया आणि दक्षिण आफ्रिकेत आहेत.
वर्णावर आधारित युद्ध भडकविण्याचा कट
सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांनी समुहाच्या दोन नेत्यांच्या विरोधातील गुन्हेगारी आरोपांचा खुलासा केला होता. वंशावर आधारित युद्ध भडकविण्याच्या उद्देशाने अश्वेत, ज्यू आणि स्थलांतरितांवर हल्ले करण्यासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला होता. टेररग्राम कलेक्टिव्हला दहशतवादी संघटना घोषित करत त्याच्यावर बंदी घातली जाणार असल्याचे ब्रिटननेही म्हटले होते.त र अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्वत:चा कार्यकाळ संपण्यापूर्वी श्वेत वर्चस्ववादाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे.









