कराड :
कराड शहरातील गोळेश्वर परिसरात बांधकामाच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने कोयता व तलवारीसह हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून दोन्ही बाजूंवर ‘साधी दुखापत’ या प्रकारात गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अल्लाबक्ष मुल्ला यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्याचे स्लॅबचे बांधकाम सुरू होते. साफसफाईदरम्यान टाकलेला मलबा व धुरळा खाली जात फिरोज मोमीन यांच्या अंगावर पडल्याने वाद उफाळला. त्यातून दोन्ही गटांतून शाब्दिक चकमक झाली आणि हाणामारीपर्यंत पोहोचली.
उमर असलम मोमीन (रा. सुमंगल नगर, गोळेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अल्लाबुकस आमीन मुल्ला, इरफान अल्लाबक्ष मुल्ला, गफ्फार अल्लाबक्ष मुल्ला, जुबेर अल्लाबक्ष मुल्ला व इमरान अल्लाबक्ष मुल्ला (सर्व रा. बापूजी साळुंखे नगर, गोळेश्वर, कराड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व कोयता घेऊन धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी गफ्फार अल्लाबक्ष मुल्ला (रा. बापूजी साळुंखे नगर, गोळेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमर असलम मोमीन, अरफान फिरोज मोमीन, फिरोज रज्जाक मोमीन, अमानुल्ला रज्जाक मोमीन, आफताब अमानुल्ला मोमीन, असलम रज्जाक मोमीन व समिना मोमीन (सर्व रा. सुमंगल नगर, गोळेश्वर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत तलवार घेऊन धमकी देणे, मारहाण व जीवघेणी धमकी दिल्याचा उल्लेख आहे.
या घटनेत दोन्ही गटातील काही जण जखमी झाले असून त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले. पोलिसांनी दोन्ही तक्रारींवरून गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. अद्याप कोणत्याही संशयितांना ताब्यात घेतलेले नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी सुरू आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सांगितले.








