हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी अफझल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या हुशारीने वाघनखांचा वापर करून अफझल खानाचा वध केला. त्याच्या वधावेळी शिवरायांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून महाराष्ट्रात येणार म्हणून पंधरा दिवसांपूर्वी देशभरात वाघनखांची चर्चा सुरू झाली होती. आता कर्नाटकही वाघनखांमुळे ठळक चर्चेत आले आहे.
पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढती आहे. कर्नाटकाने केंद्राकडे 17 हजार 901 कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. कृषीमंत्री एन. चलुवरायस्वामी, ग्रामीण विकासमंत्री प्रियांक खर्गे, महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा आदी प्रमुख मंत्र्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटकातील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने जो नुकसानीचा अंदाज दिला आहे, त्याहीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. दुष्काळामुळे 33 हजार 770.10 कोटी रुपयांची पीकहानी झाल्याचा अंदाज राज्य सरकारने बांधला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. दुष्काळी स्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. धरणे व नद्यांमधील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचेही नियोजन करण्याची गरज आहे.
कर्नाटकात सध्या आणखी एक मुद्दा ठळक चर्चेत आला आहे. वनविभागाचे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रेटी व प्रमुख स्वामीजी अडचणीत आले आहेत. हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी अफझल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या हुशारीने वाघनखांचा वापर करून अफझल खानाचा वध केला. त्याच्या वधावेळी शिवरायांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून महाराष्ट्रात येणार म्हणून पंधरा दिवसांपूर्वी देशभरात वाघनखांची चर्चा सुरू झाली होती. आता कर्नाटकही वाघनखांमुळे ठळक चर्चेत आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खासगी वाहिनीवर बिग बॉस रिअॅलिटी शो सुरू झाला आहे. यामध्ये सहभागी झालेल्या वर्तुर संतोष नामक एका स्पर्धकाने आपल्या गळ्यात वाघनखांची साखळी घातली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रसिद्ध अभिनेते किच्चा सुदीप करतात. शनिवारी या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणावेळी वर्तुर संतोष यांच्या गळ्यात सोन्यामध्ये मढवलेली दोन वाघनखे दिसून आली. लगेच दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिग बॉसच्या घरात घुसून वर्तुर संतोष यांना ताब्यात घेतले. त्याच्याजवळील दोन वाघनखे जप्त करण्यात आली आहेत. बिग बॉस हाऊसमधून स्पर्धकाला परप्पन अग्रहार कारागृहात जावे लागले आहे.
या प्रकरणानंतर कर्नाटकात सोशल मीडियावर वाघनखांविषयी प्रामुख्याने चर्चा सुरू झाली. खासकरून चित्रपट अभिनेते, राजकीय नेते व त्यांची मुले, मठाधीश यांच्या गळ्यातील वाघनखांचे लॉकेट, काही मठाधीश बसण्यासाठी वापरत असलेली वन्यप्राण्यांची कातडी याविषयी व्यापक चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट अभिनेते दर्शन, निर्माते रॉकलाईन वेंकटेश, अभिनेते व खासदार जग्गेश, धनंजय गुरुजी, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल यांच्या गळ्यातील वाघनखांच्या लॉकेटची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. राजकीय नेत्यांसाठी नेहमी आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे विनय गुरुजी हे बसण्यासाठी व्याघ्रचर्म वापरतात. त्यांचीही छबी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सिलेब्रिटी, मठाधीश, राजकीय नेते आदींना नोटिसा पाठविल्या आहेत. काही नेत्यांच्या घरावर छापे टाकून तपासणीही करण्यात आली आहे. संकटे वाढताच आमच्या गळ्यातील वाघनखे खरी नाहीत. ती शोभेची आहेत, अशी सांगण्याची वेळ राजकीय नेत्यांवर आली आहे. वनमंत्री ईश्वर खंडे यांनी तर कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबवणार नाही, असे जाहीर केले आहे.
वन्यप्राणी, त्यांची नखे, हस्तीदंत, कातडे आदींचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. आजही अनेकांच्या घरात हरिणांची शिंगे, वाघ किंवा हरिणाचे कातडे, हस्तीदंत पहायला मिळतात. वाघ व सिंहांची नखे लॉकेटसाठी वापरली जातात. आजवर कोणीच यावर आक्षेप घेतला नाही. बिग बॉस घरातील स्पर्धकांमुळे सामोरा आलेला हा प्रकार अनेकांना संकटदायक ठरला आहे. वनविभागाचे अधिकारीही वाघनखांच्या लॉकेटकडे आजवर गांभीर्याने पहात नव्हते. दहा-वीस हजारात वाघनखांची खरेदी करून ते सोन्यामध्ये मढवून गळ्यात घालून मिरवण्याची अनेक धनिकांना हौस असते. सिलेब्रिटी तर यापूर्वी वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे अनेकवेळा चर्चेत आले होते. आता वाघनखांमुळे त्यांची चर्चा घराघरात पोहोचली आहे. राजकीय नेत्यांचे कुटुंबीय, चित्रपट अभिनेत्यांपुरती ही चर्चा राहिली नाही. गावोगावी ज्यांच्या गळ्यात वाघनखांचे लॉकेट दिसते, ज्यांनी सोशल मीडियावर आजवर अशा लॉकेटचे प्रदर्शन केले आहे, त्यांच्याविषयी लोक स्वत:हून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत आहेत. त्यामुळे संबंधितांना नोटिसा देऊन कारवाई करण्याचा सपाटाच सुरू झाला आहे.
वाघनखांची लॉकेट व त्यांची संख्या लक्षात घेता नखांसाठी व कातड्यांसाठी किती वाघांची शिकार झाली आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वर्तुर संतोष याच्यामुळे वाघनखांची चर्चा सुरू झाली, त्याने तामिळनाडूतील होसूरजवळील एका गावातून 20 हजारात त्यांची खरेदी केल्याची जबानी दिली आहे. वन्यप्राण्यांची शिकार करू नये, त्यांची कातडी किंवा शरीराचे इतर कोणत्याही अवयवांचा वापरही करू नये, असा कायदा आहे. वाघनखांच्या बाबतीत मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात होते. सोशल मीडियामुळे वाघनखे घालणेही दखलपात्र गुन्हा आहे, याची जागृतीच सुरू झाली आहे. अनेक चित्रपट अभिनेते व मठाधीशांनी आपल्याजवळील वाघनखे व वन्यप्राण्यांचे कातडे वनविभागाकडे परत केली आहेत. वनखात्याच्या नोटिसीला उत्तर देणे कळेनासे झाले आहे. अनेकांनी तर आमच्या पूर्वजांपासून ही वाघनखे आमच्याकडे आहेत, असा पवित्रा घेत स्वत:चा बचाव करण्यासाठी धडपड सुरू केली असली तरी कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडणे त्यांना कठीण जात आहे. कन्नडमधील बिग बॉसने केवळ पंधरा दिवसातच वाघनखांच्या वापरावरून हलकल्लोळ उडवून दिला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण, त्यांची अवैध शिकार आदींविषयी समाजमनामध्ये बऱ्यापैकी जागृतीही झाली आहे, हेही नसे थोडके!








