प्रवाशांत भिती, वाहतुकीला अडथळा, बंदोबस्ताची मागणी
बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे.त्याबरोबर दररोज हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण होत आहे. कुत्र्यांचे कळप संपूर्ण बस स्थानकात वावरत असल्याने प्रवाशी आणि बसेसना अडथळा निर्माण होत आहे. बस स्थानकातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
शहरातील नागरी वसतीबरोबर बस स्थानक, बाजारपेठ आणि इतर मोकळ्या ठिकाणी कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेकडून केवळ नावापुरतीच नसबंदी मोहीम राबविली जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुत्र्यांचे कळप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बस स्थानकात कुत्र्यांची दहशत निर्माण होत असल्याने प्रवाशांची गोची होत आहे. कुत्र्यांचा कळप बसथांबे आणि फलाटावर झोपत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बस स्थानकात फेरीवाले, व्यावसायिक टाकाऊ पदार्थ त्याठिकाणी टाकत असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी भटकी कुत्री वाढू लागली आहेत. काही वेळा भटकी कुत्री आसनावर ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे कुत्री आसनावर आणि प्रवाशी रस्त्यावर असेही चित्र दिसत आहे. मध्यवर्ती बस स्थानकात 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्याही दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे बस स्थानक हजारो प्रवाशांनी गजबजू लागले आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांनी प्रवाशांना हैराण करून सोडले आहे.
प्रवाशांवर धावून जाण्याचे प्रकार
बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांवर भटकी धावून जाण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे भटकी कुत्री प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागली आहेत. आधीच शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यातच बस स्थानकातील कुत्र्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.









