‘मैं हू डॉन’ म्हणत रहिवाशांवर उगारला कोयता, कोल्हापुराती धक्कादायक प्रकार
कोल्हापूर : ‘मी गुंडांच्या गैंगमध्ये आहे, माझ्या नादाला लागू नका, तुम्हाला फाडून टाकेन’, ‘मैं हू डॉन’ असे म्हणत अपार्टमेंटमधील रहिवाशांवर कोयता उगारत दहशत माजविणाऱ्या तरुणास करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. ओमकेश उमेश आलमेलेकर (वय ४२, रा. गुरुप्रसाद आपार्टमेंट, इंगवलेनगर, फुलेवाडी रिंगरोड) असे त्याचे नाव आहे.
रविवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फुलेवाडी परिसरातील इमारतीमध्ये हा प्रकार घडला. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी आलमेलेकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलेवाडी येथील गुरुप्रसाद अपार्टमेंटमध्ये ओमकेश आलमेलेकर हा गेल्या वर्षभरापासून राहत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून अपार्टमेंटमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार करत आहे. जिन्यात
कचरा आणि पाणी टाकणे, जिन्यात मध्येच झोपणे, शेजाऱ्यांसोबत वाद घालण्याचे प्रकार तो करत आहे.
रविवारी (२२ जून) रोजी सकाळी ओमकेश हातात कोयता घेऊन ‘मै हूँ डॉन, असे म्हणत जिन्याच्या रेलिंगवर कोयता ओढत निघाला होता. याबाबत रहिवाशांनी जाब विचारला असता तो कोयता उगारून अंगावर धावून गेला. ‘मी गुंडांच्या गैंगमध्ये आहे, माझ्या नादाला लागू नका, तुम्हाला फाडून टाकेन’, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली.
यामुळे घाबरलेल्या रहिवाश्यांनी तत्काळ करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत फिर्याद दाखल होताच करवीर पोलिसांनी आलमेलेकर याला ताब्यात घेतले, त्याला समज देऊन सोडून देण्यात आले.








