दुसऱ्या दिवशीही चकमक : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील राजौरी येथील कांडी भागात शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली चकमक दुसऱ्या दिवशीही सुरू होती. शनिवारी पहाटे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले तर एक जण जखमी झाला. खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडून एक एके-56 रायफल, 4 मॅगझिन, 9 एमएम पिस्तूल आणि मॅगझिन, ग्रेनेड आणि दारूगोळा पाऊच जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी येथे शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी स्फोट घडवल्याने लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले होते.
राजौरीमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरी येथे पोहोचले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सकाळी राजौरी येथे हुतात्मा जवानांना श्र्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, बारामुल्लाच्या करहामा कुंजरमध्ये शनिवारी पहाटे 4 वाजल्यापासून चकमक सुरू झाली आहे. येथे आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने दिवसभर येथे विशेष शोधमोहीम राबविण्यात आली.
दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेला कांडी हा परिसर राजौरीतील डोंगराळ भाग आहे. येथे घनदाट जंगल असून अनेक गुहादेखील आहेत. त्यामुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. राजौरीतील कांडीच्या जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने येथे 3 मे पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. 20 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी याच भागात ईदसाठी फळे आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या व्हॅनवर ग्रेनेड फेकले होते. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केल्याने वाहनाला लागलेल्या आगीत पाच जवान हुतात्मा झाले होते. या मोठ्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने दहशतवाद्यांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ सुरू केले आहे.
20 एप्रिलच्या घटनेनंतर लष्कर, सीआरपीए आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली आहे. याशिवाय श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट केली आहे. श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे दरम्यान जी-20 बैठक होणार असून अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होणार असल्याने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केलेली आहे.









