घरांच्या पडझडीत पत्नी मुलीसह एक जखमी : सुदैवाने प्राणहानी टळली
वार्ताहर / कडोली
बुधवारी मध्यरात्री झालेल्या भयानक वादळी वाऱ्याने आणि पावसाने हंदिगनूर पंचक्रोशीतील बोडकेनट्टी, कुरिहाळ आदी भागात घरांच्या पडझडीबरोबर, झाडे उन्मळून पडली आहेत. घरांच्या पडझडीत पती-पत्नीसह मुलगी जखमी झाली आहे. सुदैवाने प्राणहानी टळली आहे.
हंदिगनूर पंचक्रोशीतील केदनूर, मण्णीकेरी, बोडकेनट्टी, कुरीहाळ आदी भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्याने अक्षरश: धुमाळूक घातला होता. यामुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. विजांच्या कडकडाटासह वाऱ्याने भयानक रूप धारण केल्याने लोकांना बाहेर पडणेही भीतीचे वाटत होते. केदनूर-मण्णीकेरी मार्गावरील अनेक झाडे उन्मळून शेतवडीत पडल्याचे चित्र दिसत होते. शिवाय हंदिगनूर-बोडकेनट्टी, कुरीहाळ, राजगोळी मार्गावरही ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. मार्गावर पडलेली झाडे मशीनच्या साहाय्याने कापून रस्ता खुला करण्यात आला. तसेच झाडे उन्मळून पडल्याने याचा विद्युत खांब-वीजतारांवर परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी विद्युतखांब कोसळून तारा तुटल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व खेड्यांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.

या वादळी वाऱ्याने कुरीहाळ येथे कलाप्पा फकीरा पाटील यांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या पडझडीच्या वेळीच स्वत: घरमालक कलाप्पा, पत्नी शोभा आणि मुलगी तुळसा घराबाहेर पडताना जखमी झाले आहेत. घराबाहेर पडण्यास आणखी वेळ झाला असता तर प्राणहानी झाली असती. तसेच कुरीहाळ येथे यल्लाप्पा बसरगे यांच्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच भीमराव बगळणावर यांच्याही घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. मण्णीकेरी येथे यल्लाप्पा पाटील यांच्या केळीबागेतील अनेक झाडे भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
बंबरगा येथे 200 केंबड्या मृत रात्री वादळी वाऱ्यात बंबरगा येथील पुंडलिक नाना कोले यांच्या कुक्कुटपालन शेडचे पत्रे उडून गेल्याने त्यातील सुमारे 200 कोंबड्या मृत झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.









