तासगाव तालुक्यात भीषण अपघात
तासगाव : तासगाव तालुक्यातील गौरगाव फाटा येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून, यात एका लहान बालकाचाही समावेश आहे. चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद येथील पती-पत्नी आणि त्यांचा सुमारे दहा वर्षांचा मुलगा असे तिथे कुटुंबीय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावाकडे जात होते. दुपारी चारच्या सुमारास गौरगाव फाटा परिसरात चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला व वाहन पुलाच्या काठावर जाऊन जोरात आदळले. या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला असून, पती-पत्नी व मुलगा तिघेही जखमी झाले.
अपघातानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोढे विकास सोसायटीचे माजी चेअरमन नेताजी पाटील यांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलावून तिन्ही जखमींना उपचारासाठी पाठवले. त्यांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी बाहने थांबल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते.








