दुचाकीस्वारासह दोघे गंभीर
देवगड/प्रतिनिधी
देवगड – निपाणी महामार्गावर जामसंडे दिर्बादेवी स्टॉप नजीक भरधाव एस. टी. ची विरुद्ध दिशेला जात दुकानाच्या पत्रा शेडला जोरदार धडक. या धडकेमुळे याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीवर शेड कोसळली. त्यात दुचाकी स्वार व त्याच्या मागे बसलेला त्याचा भाऊ दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ६.३० वा सुमारास घडला.
या अपघातात तन्मय तुषार बांदेकर (२५) व तेजस तुषार बांदेकर (२०, दोन्ही रा. देवगड आनंदवाडी) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड एस. टी. डेपोतून सकाळी ६.१५ वा. देवगड- वानिवडे ही बस वानिवडे जात होती. जामसंडे दिर्बा देवी स्टॉप नजीक चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात मारुती माने यांच्या दुकानाच्या शेडला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेने शेड कोसळली. याचवेळी समोरून देवगडच्या दिशेने येत असलेल्या तन्मय व तेजस बांदेकर बंधूंच्या दुचाकीवर कोसळली. यावेळी शेडचे पत्रे व लोखंडी अँगल दोघांच्या अंगावर कोसळले. यात तेजस याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर टांमयला देखील डोक्याला व पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी आमदार ऍड. अजित गोगटे, नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.









