पटियालात शीख-हिंदू संघटना आमने-सामने ः गोळीबार, दगडफेकीसह तलवारींचा वापर
पटियाला / वृत्तसंस्था
पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी खलिस्तानविरोधी मोर्चात शीख आणि हिंदू संघटना आमने-सामने आल्या. हिंदू संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना काही शीख संघटनांनी त्यांना विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. यादरम्यान काहींनी दगडफेक केल्यानंतर परिस्थिती चिघळली. या हल्ल्यात एसएचओच्या हाताला दुखापत झाली आहे. यानंतर एसएसपींनी परिस्थिती हाताळण्यासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
वाढलेल्या तणावानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या तणावाचे लोण राज्यात अन्यत्र पसरल्याने काही भागात परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी शीख संघटनांना निदर्शने करण्यापासून आणि हिंदू संघटनांना मोर्चे काढण्यापासून रोखले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पटियालाच्या काली माता मंदिराला कुलूप लावून बंद केले आहे. त्याचबरोबर पटियाला येथील फव्वारा चौकात शीख संघटनांनी निदर्शने केल्यांनतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पंजाब पोलीस आणि आम आदमी पक्षाच्या सरकारने या लोकांवर कठोर कारवाई करावी, असे हिंदू संघटनेचे नेते हरीश सिंगला म्हणाले.
खलिस्तानच्या पुतळा दहनावरून वाद
येथे शिवसेनेने खलिस्तानविरोधात पुतळा जाळण्याची तयारी केली होती. जाळपोळीसंबंधीची माहिती मिळताच खलिस्तान समर्थकांनी निदर्शने सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शीख संघटनांचे सदस्य तलवारी घेऊन काली माता मंदिरात पोहोचले. दोन्ही बाजूंमध्ये बरीच वीट आणि दगडफेक झाल्यानंतर तणाव वाढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जमावाच्या हल्ल्यात एसएचओ जखमी
यादरम्यान एसएचओ करणवीर यांनी शीख आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर एसएसपी नानक सिंह घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. अधिक सुरक्षा फौजफाटा मागवून वातावरण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
अफवांवर विश्वास ठेऊ नकाः आयजी
परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोणीतरी अफवा पसरवल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. एसएचओचा हात कापल्याचीही अफवा आहे. तथापि, परिस्थिती पूर्णपणे शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे पटियाला रेंजचे आयजी राकेश अग्रवाल यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची डीजीपींशी चर्चा
पटियालाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यासंदर्भात मी डीजीपीशी बोललो असून परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. सरकार या संपूर्ण प्रकरणावर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. कोणालाही शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पंजाबमध्ये शांतता आणि बंधुता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्पष्ट केले आहे.









