उत्तर प्रदेशात अनेक स्थानी बंदोबस्तात वाढ
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशात अनेक खेड्यांमध्ये मंदिरांची विटंबना करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. अनेक मंदिरांवर समाजकंटकांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असा मजकूर रंगविल्याने हा तणाव निर्माण झाला असून अनेक हिंदू संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे.
अलिगढ जिल्ह्यातील तीन गावांमधील पाच मंदिरांवर रात्री कोणीतरी ‘आय लव्ह मोहम्मद’ हे वाक्य रंगविल्याचे दिसून आल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अनेक हिंदू संघटनांनी केली. अलिगढच्या स्थानिक प्रशासनाने चौकशीला आदेश त्वरित दिला आहे. अलिगडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पाच मंदिरांना भेट दिली असून स्थिती नियंत्रणात आणली आहे. या मंदिरांना संरक्षण देण्यात आले असून मंदिरांची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. काही जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक नागरीक आणि संघटना यांनी या प्रकाराचा तीव्र भाषेत निषेध केला आहे. कोणीही धार्मिक स्थळांची विटंबना करुन अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नयेत, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले असून चौकशीला आरंभ केला आहे.
भावना भडकाविण्याचा उद्देश
हिंदूंना अप्रिय असणारा मजकूर मंदिरांवर रंगविण्यामागे भावना भडकाविण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो. दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करुन दंगली घडविण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे पोलिसांचे प्रतिपादन आहे. काही दिवसांपूर्वी ‘आय लव्ह मोहम्मद’ हे प्रकरण या राज्यात गाजले होते. काही स्थानी यामुळे तणावही निर्माण झाला होता. आता पुन्हा याच माध्यमातून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क भूमिका घेतली आहे.









