दोन्ही देशांकडून संभाव्य युद्धाची तयारी : सैन्यभरतीला प्रारंभ
वृत्तसंस्था/ बँकॉक
पूर्व आशियातील दोन देश थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. थायलंडसोबतच्या सीमेवरील तणाव पाहता नागरिकांची सैन्यात अनिवार्य भरती सुरू करणार असल्याची घोषणा कंबोडियाने केली आहे. कंबोडियाच्या कायद्यात 2006 साली सैन्य भरती अनिवार्य करणारी तरतूद लागू करण्यात आली होती.
28 मे रोजी कंबोडियाच्या एका सैनिकाचा वादग्रस्त सीमेवर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील सीमा बंद करण्यात आली आहे. कंबोडियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तसेच थायलंडकडून होणारी आयात रोखली आहे. तर थायलंडच्या पंतप्रधान पेंटोंग्टार्न शिनावात्रा यांना कंबोडियाच्या नेत्यासोबतचे संभाषण उघड झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता.
संघर्षाचा हा काळ आमच्यासाठी एका धड्याप्रमाणे आहे. ही आमच्या सैन्याची समीक्षा, आकलन आणि स्वत:चे लक्ष्य स्थापित करण्यासाठी एक संधी असल्याचे उद्गार कंबोडियाचे पंतप्रधान हुन मॅनेट यांनी काढले आहेत. कंबोडियात 18-30 वयोगटातील सर्व नागरिकांना सैन्यप्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण 18 महिन्यांचे असणार आहे. कंबोडियाच्या सैन्यात 2 लाख जवान आहेत, तर थायलंडच्या सैन्यात सुमारे 3.5 लाख जवान आहेत.
कंबोडियाच्या पंतप्रधानांनी आता स्वत:च्या सैन्याचे बजेट वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. कंबोडियात चीनने अलिकडेच एक विशाल नौदल तळ स्थापन केला आहे. चीन कंबोडियातील स्वत:ची उपस्थिती आणि प्रभाव वाढवत आहे. चीनने कंबोडियाला अनेक आधुनिक शस्त्रास्त्रsही पुरविली आहेत.









