ट्रम्प यांनी पाठविल्या युद्धनौका : जिनपिंग यांनी दाखविला आक्रमपणा
वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलानजीक स्वत:च्या नौदलाच्या पाणबुडी आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना नार्को टेररिस्ट संबोधिले आहे. तर दुसरीकडे चीनने अमेरिकेच्या या पावलावर कठोर टीका केली आहे. चीनच्या क्षी जिनपिंग सरकारने व्हेनेझुएलानजीक अमेरिकेच्या नौदलाच्या तैनातीची कठोर शब्दांत निंदा केली आहे.
अमेरिकेने विदेशात हस्तक्षेप करणे सोडून द्यावे. संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरच्या तत्वांच्या विरुद्ध असलेल्या आणि कुठल्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही पावलाला चीनचा विरोध आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बलप्रयोगाची धमंकी किंवा अन्य प्रकारे व्हेनेझुएलाच्या अंतर्गत विषयांमध्ये बाहेरील शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध करतो असे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले आहे.
शांतता सर्वांच्या हिताची
दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेसाठी अमेरिका जबाबदारपणे वागेल अशी अपेक्षा आहे. क्षेत्रात शांतता कायम राहणे सर्वांच्या हिताचे असल्याचे निंग यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेने कमीतकमी तीन युद्धनौका व्हेनेझुएलानजीक समुद्रात तैनात केल्या आहेत.
व्हेनेझुएला सरकार संतप्त
अमेरिकेच्या निर्णयावर व्हेनेझुएला सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या धमक्यांच्या प्रत्युत्तरादाखल व्हेनेझुएलचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी 45 लाख मिलिशिया सदस्य तैनात करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आमचा देश घाबरणार नाही आणि स्वत:च्या लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलणार असल्याचे मादुरो यांनी म्हटले आहे.
ट्रम्प-मादुरो तणाव
ट्रम्प यांचा मादुरोसोबत पहिल्या कार्यकाळापासूनच तणाव आहे. ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून हा तणाव वाढला आहे. व्हाइट हाउस व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा हिस्सा संबोधित आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी जबाबदार लोकांना शिक्षा करण्यासाठी सर्व पावले उचलली जातील असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी म्हटले आहे. याचबरोबर अमेरिकेने मादुरो यांच्या अटकेकरता इनामही घोषित केले आहे. या इनामाची रककम आता 5 कोटी डॉलर्स करण्यात आली आहे.









