पोलीस प्रशासनाने अशा कृत्याचा छडा लावण्याची मागणी; पोस्टर फाडून मोबाईलवर फोटो काढणे संशयास्पद
सांगरूळ / वार्ताहर
काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांचे पोस्टर फाडल्याने सांगरूऴ गावामध्ये तणाव निर्माण झाला असून याचा निषेध करण्यासाठी गावकऱ्यांकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सर्व गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून हे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावागावातून त्यांची पोस्टर लागलेली आहेत. सांगरूळ कळे व वाकरे फाटा या ठिकाणची त्यांची पोस्टर अज्ञात व्यकींनी फाडली आहेत. पोस्टर फाडणाऱ्यांनी पोस्टर पाडल्यानंतर त्याचे मोबाईलवर फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकली आहेत. त्यामुळे सांगरूळ गावात गेले काही दिवस तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याने गावामध्ये होणाऱ्या गटातटाच्या भांडणाचा मोठा अनर्थ टळला.
भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून असले हिन दर्जाचे कृत्य काही राजकिय नेते करत असल्याचा आरोप करून पण असल्या हिन दर्जाच्या कृत्याला सांगरूळची जनता बळी पडणार नाही. असे भ्याड कृत्य करणाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत. अशी प्रतिक्रिया सांगरूळ येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व तरुण मंडळांच्या वतीने आयोजित निषेध सभेत व्यक्त करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात पांडुरंग खाडे होते.
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगरुळ गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची व बाजीराव खाडे यांची पोस्टर अज्ञातांनी फाडली आहेत . पोस्टर फाडणाऱ्यांनी पोस्टर फाडून त्याचे मोबाईलवर फोटो काढल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे .यामुळे हे कृत्य भाडोत्री समाजकंटकामार्फत घडवून आणले असल्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकारच्या गोष्टींमधील लक्ष घालून याचा छडा लावावा. सणासुदीच्या दिवसात अशा प्रकारची हीन कृत्ये करून गावामध्ये भांडणे लावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आपण सर्व ग्रामस्थ मिळून हाणून पाडूया असे आवाहन केले.









