वृत्तसंस्था / रतलाम
मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथे एका गणेश मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणपती आणणाऱ्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. नंतर या मिरविणुकीला अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले. रतलाम शहराच्या मोचीपुरा भागात या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून या घटनेच्या निषेधार्थ हजारो संतप्त लोकांनी स्थानिक पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. परिसरात धार्मिक दंगल घडवून आणण्यासाठी ही दगडफेक करण्यात आली असा आरोप स्थानिकांनी केला.
संतप्त जमावाने काही दुकाने आणि दुचाक्यांना आग लावून आपला राग व्यक्त केला. दगडफेक करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि ही घटना एका व्यापक कटाचा भाग आहे काय, याची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यास प्रारंभ केला असून अन्य धर्माच्या लोकांनी दगडफेक केली आहे काय याचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा दगडफेकीत अन्य धार्मियांचा हात आहे.









