रस्त्याचे काम बंद करण्याची मागणी : पंचायत मंडळ 16 रोजी निर्णय घेणार
प्रतिनिधी/ शिरोडा
बोरी पंचायत क्षेत्रात बेतकी येथे होऊ घातलेल्या नियोजित इस्कॉन प्रकल्पावरून पंचायत मंडळ व विरोध करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान तणाव निर्माण झाला. पंचायत कार्यालयात साधारण तीन तास या विषयावर जोरदार चर्चा झाली. येत्या 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पंचायत मंडळाच्या पाक्षिक बैठकीत या प्रकल्पावर पंचायत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चर्चेदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंचायत कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच सरपंच दुमिंगो वाझ यांना पोलीस संरक्षणार्थ कार्यालयाबाहेर आणावे लागले.
बेतकी येथील पठारावर एका खासगी जागेत इस्कॉन संप्रदायाचा वेदिक व्हीलेज प्रकल्प होऊ घातला आहे. पंचायत क्षेत्रातील काही ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यांपासून त्याला विरोध सुरू केला आहे. मागील एक- दोन ग्रामसभामध्ये हा विषय तापला होता. पंचायतीने प्रकल्पाच्या रस्त्याला दिलेला ना हरकत दाखला मागे घ्यावा व या प्रकल्पासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची मागणी आहे. शनिवारी प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी इस्कॉनचे काही प्रतिनिधी बोरी पंचायतीमध्ये आले होते. स्थानिक पंचसदस्याने बेतकी वाड्यावरील नागरिकांना त्यांच्याशी चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी सरपंच, सचिव व अन्य पंचसदस्य उपस्थित होते. चर्चा सुरू होण्याआधीच विरोध करणारे नागरिक आक्रमक बनले व त्यांनी प्रकल्पाविरोधात कुठलीच तडजोड करणार नसल्याचा पवित्रा घेतला. सरपंच व सचिवांनाही संतप्त नागरिकांनी धारेवर धरले. त्यामुळे प्रचंड गदारोळ व तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पंचायतीने रस्त्याच्या कामाला दिलेला ना हरकत दाखला त्वरित मागे घ्यावा व कामाला स्थगिती देण्याचे आदेश जारी करावेत. त्यासंबंधी लेखी हमी आताच द्या, त्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे तणाव अधिकच वाढला. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन सरपंच व उपस्थित पंचसदस्यांनी बैठक घेतली. प्रकल्पाला आक्षेप घेणारे पत्र 4 ऑगस्ट रोजी पंचायत कार्यालयात सादर करण्यात आले आहे. त्यानंतर पंचायत मंडळाची पाक्षिक बैठक झालेली नाही. त्यामुळे येत्या 16 रोजी होणाऱ्या बैठकीत या विषयावर पंचायत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. त्यानंतर विरोध करणाऱ्या काही नागरिकांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व पंचायतीचा निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी केली.









