भारताकडून कतारकडे चिंता व्यक्त, एक प्रत परत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कतार या देशाने शीखांचा पवित्र धर्मग्रंथ असणाऱ्या ‘गुरु ग्रंथसाहिब’च्या काही प्रती जप्त केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारत आणि कतार या दोन मित्र देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन कतारच्या प्रशासनाकडे आक्षेप व्यक्त केला आहे. कतारने या ग्रंथाची एक प्रत शुक्रवारी परत दिली असल्याचीही माहिती दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुरु ग्रंथ साहिबच्या किती प्रती जप्त करण्यात आल्या आहेत, याविषयी अद्याप स्पष्टता नाही. किमान दोन प्रती कतारच्या प्रशासनाने ताब्यात घेतल्या असाव्यात अशी माहिती देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दुपारी या घटनेची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. कतारमधील शीख समुदायाने या घटनेविषयी भारतीय दूतावासाला कळविल्यानंतर त्वरित भारत सरकारने आक्षेप नोंदविला. प्रती जप्त करण्याचे कारणही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. जप्त केलेल्या सर्व प्रती सन्मानपूर्वक परत केल्या जाव्यात असा आग्रह भारताच्या विदेश व्यवहार विभागाने कतारकडे धरला आहे.
दोन ‘स्वरुपे’ जप्त
कतारच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरु ग्रंथ साहिबची दोन ‘स्वरुपे’ जप्त करण्यात आली आहे. हे ग्रंथ अत्यंत सन्मानपूर्वक ठेवण्यात आले असून त्यांची तपासणी झाल्यानंतर ते परत दिले जाणार आहेत. एक स्वरुप परत करण्यात आले आहे, अशी माहिती कतारची राजधानी दोहा येथील शीख समुदायाने दिली आहे. दुसरे स्वरुपही लवकरच सन्मानपूर्वक परत दिले जाईल, असे आश्वासन दिले गेले आहे. तथापि, ही जप्ती कारवाई का करण्यात आली, हे अद्यापही एक गूढ असून कतार प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आहे.









