मध्यरात्री शहापूर पोलीस स्थानकाला घेराव
प्रतिनिधी/ बेळगाव
सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणारी पोस्ट टाकल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा मुस्लीम समुदायातील युवकांनी शहापूर पोलीस स्थानकाला घेराव घातला. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत शहापूर पोलीस स्थानकाबाहेर घोषणाबाजी सुरू होती.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला त्वरित अटक करावी, या मागणीसाठी धरणे धरण्यात आली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश व त्यांचे सहकारी मध्यरात्री शहापूर पोलीस स्थानकाबाहेर दाखल झाले. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. पोलीस स्थानकाला घेराव घालणाऱ्या युवकांची मनधरणी करण्यात आली. मध्यरात्री 1 नंतर निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी पांगविले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.









