ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस तक्रार केल्याने वाद चिघळण्याची शक्यता : त्या पाच जाणांना संपूर्ण गावाचा पाठिंबा
प्रतिनिधी / वाळपई
गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळप गावामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक पुन्हा एकदा आक्रमक बनले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे ग्रामस्थांनी वीजपुरवठा खंडिताच्या निषेधार्थ वीज कर्मचाऱ्यांना अडवून धरले होते. या प्रकरणी वीज खात्यातर्फे वाळपई पोलीस स्थानावर पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे शेळप गावात संतापाची लाट पसरली असून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळप येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. तर चार दिवसांपूर्वी दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली. यामुळे संताप्त नागरिकांनी दुऊस्ती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अडवून जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे रात्रभर सदर कर्मचाऱ्यांना अडवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाळपई पोलिस स्थानकावर तक्रार केली आहे. एकूण पाच जणांच्या विरोधात ही तक्रार केलेली आहे. संबंधित पाच जणांना चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता वाळपईच्या पोलीस स्थानकात बोलविण्यात आले आहे. यामुळे गावात वीज खात्या विरोधात वातावरण चिघळलेली आहे.
वीज पुरवठा हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात दिरंगाई केली जाते. याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कर्मचाऱ्यांना रोखून धरण्यात आले होते. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीजपुरवठा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत केली होती. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्याने ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस तक्रार केल्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण गाव पोलीस स्थानकावर धडकणार!
दरम्यान याबाबत गावात एक महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये पोलीस तक्रारीबाबत चर्चा करून संताप व्यक्त करण्यात आला. चांगले सहकार्य करून सुद्धा नागरिकांविरोधात अशा प्रकारे तक्रार करून ग्रामस्थांना नाहक अडकविण्याच्या प्रयत्नाचा निषेध करण्यात आला. यामुळे ज्या पाच जणांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांच्यासोबत पूर्ण गाव वाळपई पोलीस स्थानकावर धडक देणार आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाच जणांवर कारवाई झाल्यास गंभीर परिणाम
प्रत्येक गावामध्ये सुरळीत वीजपुरवठा प्राप्त होणे ही सरकारची सुविधा आहे. मात्र ती सुविधा व्यवस्थितपणे न मिळाल्यास त्याच्या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक अधिकार आहेत. सदर अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष केल्यास त्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे पाच जणावर कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आलेला आहे.
बुधवारी वीजपुरवठा पुन्हा खंडित
दरम्यान बुधवारी संध्याकाळी पुन्हा या गावातील वीजपुरवठा खंडित झाला. आज सकाळी वीज कर्मचारी गावामध्ये परतून वीज दुऊस्तीचे काम हाती घेतले .मात्र वीज पुरवठा अजून पर्यंत सुरळीत झालेला नाही. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारा विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.









