वाहनांची जाळपोळ, जिल्ह्याच्या सीमा सील, इंटरनेट बंद, कलम 144 लागू
वृत्तसंस्था/ नूह
हरियाणातील नूह येथील ब्रज मंडल यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केल्यानंतर सोमवारी तणाव निर्माण झाला आहे. दगडफेक आणि जाळपोळीत अनेक जण जखमी झाले. या संघर्षादरम्यान लोकांनी अनेक वाहने पेटवून दिली. तणावाची परिस्थिती पाहता नूह आणि हातीनमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी निघालेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीदरम्यान दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लोकांनी एकमेकांना ठार मारण्याचा निर्धार केल्याने तणाव वाढला. बजरंग दलाशी संबंधित मोनू मानेसर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर नूह जिह्यात अनेकांची हत्या केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हा व्हिडिओ व्हायरल करून यात्रेदरम्यान मेवातमध्येच राहीन असे खुले आव्हान दिले होते. या आव्हानामुळेच परिसरात वातावरण तापले होते. मिरवणुकीदरम्यान गर्दीतील काही लोकांनी मोनू मानेसर आणि त्याच्या साथीदारांना पाहिल्यानंतर गुऊग्राम-अलवर राष्ट्रीय महामार्गावर नूह शहराजवळ प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळादरम्यान गोळीबारापासून ते जाळपोळीपर्यंतच्या घटना घडल्या. अनेक सरकारी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली तर काही खासगी वाहनांनाही जमावाने लक्ष्य केले. या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण 700-800 जवान तैनात करण्यात आले होते. हे प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. एकूणच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून अनेक ठिकाणी तुरळक घटना घडत आहेत.
या घटनेनंतर नूह-होडळ मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. याशिवाय नूह शहर पूर्णपणे सामसूम आहे. तणावामुळे दैनंदिन व्यवहारही ठप्पा झाले आहेत. नूह येथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे नल्हार मंदिरात सुमारे 5000 लोक अडकून पडले आहेत. यामध्ये आसपासच्या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे.









