जुनागडमध्ये जमावाकडून दगडफेक; वाहनांची जाळपोळ
► वृत्तसंस्था/ जुनागड
गुजरातमधील जुनागड येथे दर्गा हटवण्याच्या नोटिशीवरून तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा 600 हून अधिक लोकांनी एकत्र येत नोटिशीच्या विरोधात निदर्शने केली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत दगडफेकही सुरू केली. पोलिसांना बचावासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. यादरम्यान झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला. तसेच डीएसपींशिवाय चार पोलीस जखमी झाले. याप्रकरणी आतापर्यंत 174 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जुनागडमधील माजेवाडी रोडजवळ रस्त्यावर दर्गा आहे. जुनागड महापालिकेने पाच दिवसांपूर्वी त्यांना नोटीस बजावली होती. तसेच त्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, नोटीसच्या विरोधात शुक्रवारी 500 ते 600 लोकांनी पोलीस स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान जमावाने रस्त्यावरून जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी जखमी झाले. यानंतर पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि दुचाकीही जाळण्यात आल्या. रात्री 10.15 च्या सुमारास दगडफेक सुरू झाल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला.









