आटपाडी :
आटपाडी येथील सांगोला चौकात गनिमी कावा करून दोनवेळा बसविण्यात आलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शुक्रवारी पहाटे प्रशासनाने हटविला. चबुतऱ्यासह पुतळा हटविल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आंबेडकरप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत घटनास्थळी ठाण मांडले. प्रशासनासोबत दोन बैठका होवुनही तोडगा न निघाल्याने दिवसभर तणाव कायम होता.
आटपाडातील सांगोला चौकात 1 फेब्रुवारीच्या पहाटे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला होता. प्रशासनाने लगेच हटविला. त्यानंतर आंबेडकरप्रेमी जनतेने पुन्हा नाट्यापूर्ण खेळी करत दुसरा पुतळा बसवला. पुन्हा 4 मार्च रोजी पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाला. त्यात यश आले नाही.
मध्यंतरी हा विषय दुर्लक्षीत राहिला. परंतु शुक्रवारी पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात नियोजनबद्धरित्या हा पुतळा चबुतऱ्यासह पूर्णपणे हटविण्यात आला. ही घटना पहाटे चार वाजता समाजबांधवांच्या लक्षात आली. तीव्र संताप व्यक्त करत लोक रस्त्यावर आले. महिला, पुरूष, तरूणांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारत कोणाच्या आदेशाने पुतळा हटविला? असा सवाल केला.
त्या ठिकाणी जमाव कायम ठेवुन प्रशासनाने समोर येवुन उत्तर द्यावे, अशी मागणी लोकांनी केली. दुपारी तहसील कार्यालयात प्रांत विक्रमसिंह बांदल, डीवायएसपी विपुल पाटील, बांधकाम विभागाचे आर. एस. पाटील यांच्यासह आंबेडकरप्रेमींची बैठक झाली. प्रशासनाने बचतभवन आवारात पुतळा बसवावा, असे आवाहन केले. परंतु त्यांना आंबेडकरप्रेमींनी तीव्र विरोध केला. ही बैठक निष्फळ झाल्यानंतर पुन्हा डीवायएसपी यांच्यासोबत भारततात्या पाटील, दीपक प्रक्षाळे, सनी कदम, समाधान ऐवळे, शैलेश ऐवळे आदींनी बैठक केली. पोलिसांनी बांधकाम विभागाने केलेल्या मागणीनुसार आम्ही फक्त बंदोबस्त पुरविल्याचे सांगुन प्रशासनाला आंबेडकरप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दोन बैठकांव्दारेही पुतळ्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. आहे त्याच ठिकाणी पुतळा कायम राहिल, अशी भूमिका आंबेडकरप्रेमींनी घेतली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यालाच सातत्याने प्रशासनाकडून विरोध होत आहे. शहरात अन्य पुतळे विनापरवाना असताना फक्त डॉ.आंबेडकरांचाच पुतळा सातत्याने का काढण्यात येत आहे, यावरून प्रशासनाचा दुजाभाव सिध्द झाल्याचा आरोप जनतेने केला.
हटविण्याच्या प्रकाराचा विविध स्तरातून निषेध नोंदविण्यात आला. जाणिवपूर्वक पुतळा काढणाऱ्या असंवेदनशील प्रशासनाचा निषेध म्हणून भीमसैनिकांनी ’आटपाडी ते मंत्रालय लाँगमार्च’ काढत असल्याचे जाहीर केले. सायंकाळी आटपाडीतून मोठ्या संख्येने तरूणांनी कुच केली.








