लाठीचार्ज, अश्रूधुराच्या वापरामुळे गोंधळ
वृत्तसंस्था / इटानगर
अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एपीपीएससी) पेपरफुटी प्रकरणावरून शुक्रवारी इटानगरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि परीक्षार्थींमध्ये जोरदार संघर्ष झाला. परीक्षार्थींवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या. ‘एपीपीएससी’च्या अध्यक्षांचा शपथविधी आणि नवीन अधिकाऱयांची नियुक्ती रद्द करावी अशी उमेदवारांची मागणी आहे. तीव्र आंदोलनानंतर उमेदवारांची मागणी मान्य करण्यात आली असून आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा शपथविधी रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, राजधानी इटानगरमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इटानगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीमुळे इटानगरमध्ये उमेदवारांनी जोरदार गोंधळ घातला. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) मोठय़ा संख्येने तरुण इटानगरच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांची पोलिसांशी झटापट झाल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ाही सोडल्या. या संघर्षाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी अश्रुधुराच्या नळकांडय़ा सोडत असून आंदोलक दगडफेक करत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इटानगरचे आयजी चुखू आपा यांनी लाठीचार्जच्या घटनेला दुजोरा दिला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे सोडले आणि त्यांच्यावर लाठीचार्जही करावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संघर्षात चार सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.









