कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
कळंबा, सानेगुरूजी आदी उपनगरीय परिसरात राजकीय, सामाजिक आणि अंडरग्राउंड सम्राटांच्या जोरावर मटका, जुगार आणि तीन पानी क्लब त्या अर्थाने अगदी उत्कृष्ट अभिजातपणे चालवले जात आहेत. उपनगरात मटक्याच्या जोरावर सुरू असलेली खदखदीकडे पोलीस यंत्रणाही अर्थपूर्ण वजनामुळेच सोयिस्करपणे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
रेसकोर्स नाका, सुधाकर जोशीनगर, फुलेवाडी, आपटेनगरसह उपनगर परिसरात अभिजातपणे अवैद्य धंदे सुरु आहेत. या अवैद्य धंद्यातून मोठी माया कमवत आता सामाजिक कार्यात व्हाईट कॉलरचा ठसा उमटवण्यासाठी बुकीमालक सज्ज झाला आहे. दणक्यात महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अभिजातपणे सुरू असलेल्या या अवैद्य धंद्यांकडे पोलीस प्रशासनाचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. राजकीय वरदहस्तातून व्हाईट कॉलरच्या आडून अभिजातपणे सुरु असलेल्या अवैध धद्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकीय असो वा दोन नंबर धंद्यातील कुप्रसिध्द सम्राटांच्या हातात हात घालून उपनगरात कला क्रीडा केंद्र सुरु करणाऱ्या बुकी मालकाने आता आपल्या ब्रॅन्डने म्हणे मटका आणि इतर व्यवसाय सुरू केले आहेत. राजकीय पाठबळाच्या आडून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत हा आभिजात मालक पोलिसांच्या हक्काचा माणूस बनला आहे. अनेक तरुणांनाही त्याने आपल्या या साम्राज्यात सामावून घेत काळ्या धंद्यांचा विस्तार सुरु केला आहे. काळ्या धंद्यातून मिळवलेल्या कमाईतून व्हाईट कॉलर सामाजिक कार्य करत आगामी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. गतनिवडणुकीत त्याचा गुरु असणारा सम्राटच एनवेळी विरोधात गेल्यामुळे त्याला पराभूत व्हावे लागले होते म्हणे. आता महापालिका लढवून परिसराचा सेवक व्हायचेच असे ठरवून सामाजिक मुलामा दिलेल्या कार्यक्रमातून ब्रॅन्डींग सुरू पेले आहे. जिह्यात मटका बंद म्हणजे बंदच अशी वल्गना करणाऱ्या पोलीस दलापुढे अभिजात व्यवासायिकाने आव्हान निर्माण केले आहे. चार वर्षापूर्वी एका दणक्यात कोल्हापूरसह पर राज्यातील मटकाच्या कार्टल नेस्तानाभूत करणारे कोल्हापूर पोलीस उपनगरातील खदखद कशी रोखतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- सम्राटच्या चौकशीत दणका
मटका बुकी सम्राट कोराणे याला अटक केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी उपनगरातील या बुकीसह पाच जणांची कसून चौकशी केली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषणच्या खोलीमध्ये दोन दिवस त्याला पोलीसी खाक्या दाखवला होता. त्यांची चौकशी केली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार असल्याचे संकेत मिळताच, त्याने जिह्यातील एका मंत्र्याकडून पोलीस अधीक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस अधीक्षकांनी सर्व दबाव झुगारुन चौकशी केली. 48 तास सलग पोलीस ठाण्यामध्ये थांबवून ठेवले होते. पण ही कारवाई चौकशी पुरतीच मर्यादित राहिली. पुढे काही झाले नाही. मात्र पोलिसांच्या रडावर उपनगरातील खदखद आली आहे. उपनगरात सामाजिक वातावरण बिघडवून पाहणारी ही खदखदीच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणेनं जाण्याची गरज आहे. कोणीही किती राजकीय आश्रयाला गेला आणि पक्ष प्रवेशाच्या आणाभाका केल्या तरी पोलीस यंत्रणेपुढे सर्व समान आहेत हे दाखवण्याची संधी पोलीस यंत्रणा कशी घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- ए.एस. ट्रेडर्समध्ये गुंतवणूक
मटका, जुगार आणि क्लबच्या माध्यमातून मिळवलेली माया या पट्टयाने अनेक व्यवसायात गुंतवली आहे. व्हाईट कॉलर असल्याचे दाखवण्यासाठी अर्थमुव्हींगचा व्यवसाय सुरु केला. जेसिबी, पोकलँड आणि डंपर घेऊन त्याने हा यामध्ये जम बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र अवैद्य व्यवसायांसारखा ताजा आणि काळा पैसा यातून मिळाला नाही. यामुळे त्याने अवैद्य व्यवसायातील सुमारे पाच कोटी ऊपये ए.एस ट्रेडर्समध्ये गुंतविले. मात्र ए. एस. ट्रेडर्सच बुडाल्याने चुना लागला. ही माहिती उपनगरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर काळ्या धंद्यातला पैसा असाच जाणार अशी प्रतिक्रिया नागरिकांच्यातून व्यक्त झाली.
- कला, क्रीडा सांस्कृतिक केंद्र
आपल्या सम्राटांच्या नावावर कला क्रीडा आणि सांस्कृतिक केंद्र संभाजीनगर येथील रेसकोर्स नाका परिसरात सुरु केले होते. यानंतर जोशी नगर, आपटेनगर, फुलेवाडी परिसरात सम्राटांच्या वरदहस्ताने अनेक क्लब सुरु करुन आपले बस्तान बसवले. 2014 महपालिकेच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानेच हा सेवक होण्यासाठी पुन्ह अॅक्टिव्ह झाला आहे.
- निवडणूकीत त्याच्या दारात 52 पत्यांचा बंगला उभा करणार
शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत पुरावे दाखवत उपनगरातील मटका बुकीकडे अंगुलीनिर्देष केला होता. बुकीच्या राजकीय वरदहस्ताचा भांडाभोड केला होता. तसेच हा बुकीमालक निवडणुकीतील उमेदवार असल्यास त्याच्या दारातच 52 पत्त्यांचा बंगला उभा करण्याचा इशारा दिला. निवडणुकीत खरोखरच या बुकीच्या दारात पत्यांचा बंगला उभा राहतो की तत्पूर्वी पोलीस यंत्रणा उपनगरातील मटक्याची खदखदीचा राजकीय दबावाचा खेळ पत्याच्या बंगल्याप्रमाणे मोडून काढतात, हे पहावे लागेल.








