सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटकांना दूधसागरवर जाण्यास बंदी: पर्यटकांच्या नाराजीचे रुपांतर संतापात
धारबांदोडा : कुळे-शिगांव पंचायत क्षेत्रातील जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्याचे पावसाळी विहंगम दृष्य पाहण्यासाठी रेल्वेने शनिवारी व रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्लीसह इतर भागांतील देशी पर्यटक येत असतात. मात्र यंदा रेल्वे विभागाने तसेच गोवा सरकारनेही या धबधब्यावर येण्यास बंदीचा आदेश जाहीर केला आहे. मात्र हा आदेश पर्यटकांपर्यंत न पोहोचल्याने शनिवारी तसेच रविवारी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची निराशा झाली आणि त्यातूनच पर्यटक व अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला. रविवारी पहाटे हुबळी-बेळगावमार्गे गोवा एक्स्प्रेसने दूधसागर पर्यटनाच्या हेतूने रेल्वेत दाखल झालेल्या पर्यटकांना रेल्वेने वनखात्याच्या निर्बंधामुळे दूधसागर धबधब्यावर थांबा न घेतल्याने सर्व पर्यटकांची पंचाईत झाली. पर्यटकांना गोवा एक्स्प्रेसने कुळे येथील थांब्यावर उतरविल्याने त्यांना दूधसागरकडे जाता आले नाही, परिणामी त्यांच्या संतापाची लाट उसळली. पहाटे दाखल झालेल्या पर्यटकांना माघारी फिरण्यासाठी गोवा एक्स्प्रेसच्या सायंकाळच्या 4.30 वाजण्याच्या रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने सर्व पर्यटक कुळे येथे अडकून पडले होते.
बेशिस्त पर्यटकांनी काढल्या उठाबशी
त्यामुळे काल रविवारी दिवसभर युवकांनी धांगडधिंगा घातला. त्यांना आवरताना सर्व अधिकाऱ्यांच्या नाकेनऊ आले. बेशिस्त वागणाऱ्या तसेच शिव्या घालणाऱ्या पर्यटकांना यावेळी अधिकाऱ्यांनी उठाबशी काढण्यास लावले. काल रविवारी दिवसभर सोशल मीडीयावर याबाबत अनेक व्हीडीओ व्हायरल झाले होते. पावसाळयात दुधसागर धबधब्याचे विहंगम व विलोभनीय दृष्य पाहण्यात वेगळीच मजा असते. हा फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर मनात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. त्यामुळे जगभरातील पर्यटकांसाठी हा धबधबा कायम आकर्षण ठरला आहे. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची खबरदारी घेण्याची फार गरज असते. कारण हा धबधबा पावसाळयात अंत्यत धोक्याचा असतो, म्हणून यावर्षी गोवा सरकारने सर्व धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना तसेच स्थानिकांनाही बंदी घातली आहे.
दुधसागरवर रेल्वेचा थांबा नाही
पावसाळ्यात या धबधब्याकडे येण्यासाठी रेल्वे शिवाय दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. एखादा अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास कुळे पोलिसांची धांदल उडत असते. आतापर्यत अनेक युवक या धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याठिकाणी उतरण्यास रेल्वेचा थांबा नाही, तरी पर्यटक उतरत असतात.
पर्यटकांच्या कृत्त्यांमुळेच रेल्वेकडून बंदी
रेल्वेने येणारे पर्यटक रेल्वे कर्मचाऱ्यांना मारहाण व रेल्वेवर दगडफेक करीत असल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने येथे येण्यास पर्यटकांना बंदी घातलेली आहे. वास्तविक दुधसागर रेल्वे स्टेशनवर रेल्वेला व्यवसायिक थांबा नाही. केवळ सुरक्षेच्या कारणासाठी येथे रेल्वे थांबा घेत असते. मात्र याचा फायदा पर्यटक घेत असतात, म्हणून यंदा रेल्वेनेही बंदी घातली आहे.
पर्यटक सर्रास करतात नियमभंग
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुळे ते दुधसागर तसेच कॅसलरॉक ते कुळेपर्यंत तिकिटची सुविधा नाही. मात्र काही पर्यटक पुढची तिकिटे काढून येतात आणि येथे पोहोचल्यावर रेल्वे थांबत असल्याने त्याचा फायदा घेतात. हा गैरप्रकार असून दुधसागर स्टेशनवर उतरल्यास किंवा रेल्वे मार्गाने चालत येणाऱ्या पर्यटकांना 1000 रूपये दंड व सहा महिन्याची कैदची शिक्षा आहे. तरीही या सर्वप्रकाराला ना जुमानता पर्यटक येथे येत असतात.
रेल्वे खात्याकडून नोटीस
दूधसागर परिसर निर्बंधित क्षेत्र आहे. रेल्वेरुळावरून चालत दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्यांवर रेल्वे अॅक्ट 1989 नुसार कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशी कारवाई करण्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षेच्यादृष्टीनेच दूधसागरवर पर्यटकांना बंदी
महाराष्ट्र व कर्नाटक येथील पर्यटकांना दूधसागरवर येण्यासाठी गोवा एक्स्प्रेस रेल्वे उपयुक्त ठरत आहे. कुडची-बेळगाव येथून ही रेल्वे रात्री दीड वाजता सुटत असते. तर पहाटे चारच्या दरम्यान दूधसागर स्टेशनवर पोहोचते. त्यातच सायंकाळी वास्कोहून निघणारी गोवा एक्स्प्रेस माघारी फिरण्यास पर्यटकांना उपयुक्त ठरत असते. सध्या दूधसागर स्टेशनवर रेल्वे पोलीस व मोले वन खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. हजारो संख्येने येणाऱ्या पर्यटकांवर नजर ठेवणे रेल्वे व वन कर्मचाऱ्यांना शक्य नसते म्हणून बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या वर्षी पर्यटकाच्या मृत्यूची घटना
गेल्या वर्षी पावसाळी पर्यटनासाठी आलेला अर्पित शुक्ला हा भोपाळ येथील युवक या धबधब्यात बुडाला होता. तब्बल 18 दिवसांनी त्याचा मृतदेह हाती लागला होता. त्याचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या पथकाला दोनवेळा पाचारण करण्यात आले होते. मृतदेह मिळत नसल्याने कुळे पोलिसांनी कुळे येथील युवकांच्या सहकार्याने कुळे ते दूधसागरपर्यंतच्या संपूर्ण नदीत शोध मोहीम राबविली होती. त्यामुळे यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच पातळीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.









