जगाला सतावतेय नव्या युद्धाची भीती
वृत्तसंस्था/ तेहरान
आर्मेनियावरून इराण आणि अझरबैजानमधील तणाव वाढत चालला आहे. तणाव अशाचप्रकारे वाढत राहिल्यास दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध सुरू होऊ शकते असे बोलले जात आहे. तणावात मोठी भर पडल्याने अझरबैजानने जानेवारी महिन्यात इराणमधील स्वतःचा दूतावास बंद केला होता. त्यावेळी तेहरानमध्ये अझरबैजानच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यात एक जण मारला गेला होता. यानंतर अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह यांनी या घटनेसाठी थेटपणे इराणला दोषी ठरविले होते. दूतावासाच्या सुरक्षेवरून इराण व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

अझरबैजान पुन्हा एकदा आर्मेनियावर आक्रमण करण्याची योजना आखत आहे. अझरबैजानचा उद्देश आर्मेनियाला पराभूत करत जंगेजुर कॉरिडॉरवर कब्जा करण्याचा आहे. आर्मेनियाचे सैन्य अत्यंत कमकुवत असल्याने आपण हे युद्ध सहजपणे जिंकू असे अझरबैजानला वाटत आहे. परंतु जंगेजुर कॉरिडॉर आर्मेनियाला इराणशी जोडतो. या कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला अझरबैजानचा कब्जा आहे. अशा स्थितीत अझरबैजानने जंगेजुर कॉरिडॉरवर कब्जा केल्यास आर्मेनियाचा इराणसोबतचा संपर्क तुटणार आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून आर्मेनिया दूर जाऊ नये अशी इराणची इच्छा आहे.
इराणशी जुने शत्रुत्व
अझरबैजानचे इस्रायलसोबत घनिष्ठ संबंध आहेत. इराण हा इस्रायलचा कट्टर शत्रू आहे. अशा स्थितीत इराणचे सरकार अझरबैजानवर नाराज आहे. याचमुळे इराण उघडपणे अझरबैजानचा शत्रू आर्मेनियाला पाठिंबा दर्शवितो. अझरबैजानने जंगेजुर कॉरिडॉरवर कब्जा केल्यास रशिया अन् उर्वरित युरोपीय देशांसोबतचा आपला भूसंपर्क तुटणार असल्याचे इराण जाणून आहे. इराणच्या तुलनेत अझरबैजानचे सैन्य कमकुवत आहे. अशा स्थितीत इराण या क्षेत्रात अझरबैजानवर वरचढ ठरू शकतो.









