शेतकरी आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर : दिल्लीला निघालेले पथक माघारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून शनिवार, 14 डिसेंबरला दुपारी 12 वाजता 101 शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले, मात्र पोलिसांनी त्यांना घग्गर नदीवरील पुलावर बॅरिकेड्स लावत अडवले. जवळपास अर्धा-पाऊण तास पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान सुरक्षा जवानांनी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि अन्य मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणण्याच्या उद्देशाने पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आंदोलनस्थळावरील 101 शेतकऱ्यांच्या गटाने शनिवारी दुपारी 12 वाजता दिल्लीकडे पायी मोर्चा काढला. तथापि, काही मीटर पुढे गेल्यावर आंदोलक शेतकऱ्यांना हरियाणा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बहुस्तरीय बॅरिकेड्स लावून रोखले. आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. अश्रुधुराच्या गोळीबारामुळे काही शेतकरी जखमी झाले असून त्यांना आंदोलनस्थळी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
राष्ट्रीय राजधानीकडे मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांचा हा तिसरा प्रयत्न आहे. यापूर्वी 6 डिसेंबर आणि 8 डिसेंबरला आंदोलकांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हरियाणातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पुढे जाऊ दिले नाही. आताही पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाल्याने दिल्लीकडे जाणारे शेतकरी माघारी परतत आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
अंबालामधील अनेक गावांमध्ये इंटरनेट बंद
शेतकऱ्यांचा विरोध पाहता अंबालामधील अनेक गावांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. डांगडेहरी, लोहगढ, मानकपूर, दादियाना, बडी घेल, छोटी घेल, लहरसा, कालू माजरा, देवी नगर (हिरा नगर, नरेश विहार), सदोपूर, सुलतानपूर आणि काकरू येथे इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणांवरील इंटरनेट 17 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, या काळात लोक फोनवर बोलू शकतील.
राकेश टिकैत यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनीही शुक्रवारी पंजाबमधील शेतकरी नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी गटांना एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. डल्लेवाल हे आमचे मोठे नेते असून त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, संपूर्ण देशातील शेतकरी चिंतेत आहेत. सरकारने दखल घ्यावी. सरकार चर्चा करून मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत डल्लेवाल आपले आमरण उपोषण मागे घेतील असे वाटत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.









