महिलांवर प्रार्थनास्थळामधून दगडफेक : रस्त्यांवर उतरले लोक : आरोपी ताब्यात
वृत्तसंस्था/ नूंह
हरियाणाच्या नूंहमध्ये गुरुवारी रात्री एका प्रार्थनास्थळामधून काही अज्ञातांनी महिलांवर दगडफेक केली आहे. या घटनेत अनेक महिला जखमी झाल्या आहेत. महिलांचा एक समूह पूजेसाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती कळताच शुक्रवारी शेकडो लोकांनी एकत्र येत निदर्शने केली आहेत. नूंहमध्ये जुलै महिन्यात हिंसा झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आता विशेष दक्षता बाळगत आहेत. मदरशातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे दोन्ही समुदायाच्या प्रमुख नेत्यांना पाचारण करत शांतता बैठक घेण्यात आली.
दगडफेकीप्रकरणी आम्ही गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून सर्व आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी दिली आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रार्थनास्थळानजीक महिलांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत तीन महिला जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महिलांच्या तक्रारीवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. प्रार्थनास्थळामधून प्राप्त फुटेजच्या आधारावर तीन अल्पवयीन आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह बिजरनिया यांनी सांगितले. तसेच आरोपींच्या विरोधात एससी/एसटी अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
8 महिलांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. तिन्ही संशयित अल्पवयीन आहेत. महिलांकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांची आम्ही चौकशी करणार आहोत. स्थिती नियंत्रणात असून दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.
यापूर्वी 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर नूंह येथे सांप्रदायिक हिंसा भडकली होती. या हिंसेत दोन होमगार्डांसमवेत एकूण 6 जणांना जीव गमवावा लागला होता.









