वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे अव्वल दोन एकेरी खेळाडू सुमित नागल आणि शशिकुमार मुकुंद यांनी राष्ट्रीय टेनिस महासंघाला ते पुढील डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तानला जाणार नाहीत, असे कळविले आहे. यामुळे गोंधळलेल्या ‘एआयटीए’ने कार्यकारी समितीच्या पुढील बैठकीत खेळाडूंच्या नकारावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागल एटीपी यादीत 141 व्या क्रमांकावर असून सध्याचा भारताचा सर्वोत्कृष्ट एकेरी खेळाडू आहे, तर 477 व्या क्रमांकावर असलेला मुकुंद देशाचा विचार करता दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणार असलेल्या जागतिक गट-1 मधील ‘प्ले-ऑफ’ लढतीसाठी आपण अनुपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नागलला खेळायचे नाही, कारण लढत ग्रास कोर्टवर होणार आहे, जे त्याच्या खेळाच्या शैलीला अनुकूल नाही. तर मुकुंदने ‘वैयक्तिक कारणास्तव’ सामन्यांना नकार दिला आहे.
नागलने फार पूर्वीच संघ व्यवस्थापनाला कळवले होते की, पाकिस्तानविऊद्धच्या लढतीसाठी त्याचा विचार केला जाऊ नये. कारण ग्रास कोर्टला त्याची पसंती नाही, असे ‘एआयटीए’च्या सूत्रांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व रामकुमार रामनाथन करेल, जो त्याच्या ‘सर्व्ह व व्हॉली’ शैलीचा विचार करता या लढतीसाठी सर्वोत्तम उपयुक्त खेळाडू आहे. या लढतीचा विजेता 2024 सालात जागतिक गट-1 मध्ये राहील. भारतासाठी दुसरा सर्वोत्तम पर्याय दिग्विजय प्रताप सिंह आहे, ज्याने या वर्षी सप्टेंबरमध्ये मोरोक्कोविऊद्ध डेव्हिस चषकात पदार्पण केले.
पाकिस्तानच्या संघाचा भार ज्येष्ठ खेळाडू अकील खान आणि ऐसाम उल हक कुरेशी यांच्यावर असेल. असे असले, तरी रोहन बोपण्णा आधीच निवृत्त झालेला असल्यामुळे एकेरीतील अव्वल खेळाडू नागलशिवाय भारताचे पारडे जड होणार नाही. खेळाडूंच्या या निर्णयावर बोलताना अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सरचिटणीसांनी, राष्ट्रासाठी कर्तव्य बजावण्याची वेळ येते तेव्हा खेळाडूंनी वेगळा विचार करू नये, असे म्हटले आहे. हे चुकीचे आहे. देशाची सेवा करण्याचा प्रश्न असताना तुम्ही ते का करत नाही ? मी हे प्रकरण कार्यकारी समितीच्या हाती सोपविले आहे, असे धुपर यांनी सांगितले. जर खेळाडू आजारी असेल वा जखमी असेल, तर मी समजू शकतो. पण मुकुंद राष्ट्रीय कर्तव्यासाठी अनुपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने हे दोनदा केले आहे, असे ते म्हणाले.
2019 मध्ये देखील भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास सुरक्षेच्या चिंतेमुळे नकार दिला होता. त्यामुळे आशिया/ओशनिया गट 1 मधील लढत एक तटस्थ ठिकाण म्हणून कझाकस्तान येथे हलविण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून पाकिस्तानचे अव्वल खेळाडू ऐसाम उल हक कुरेशी आणि अकील खान यांनी लढत न खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या लढतीत मोहम्मद शोएब, हुजैफा अब्दुल रहमान आणि युसूफ खलील हे खेळले होते. भारताने यावेळीही लढत हलविण्यासाठी प्रयत्न केले होते. पण डेव्हिस कप समितीने ‘एआयटीए’चे आवाहन आधीच फेटाळले आहे.









