वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेती राहिलेल्या सिमोना हॅलेपवर दोन वेगवेगळ्या उत्तेजकविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ऑक्टोबर, 2026 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे, असे आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सी (आयटीआय) यांनी स्पष्ट केले आहे. ही 31 वर्षीय रोमानियन खेळाडू माजी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन विजेती असून गेल्या वर्षी अमेरिकन ओपनमध्ये प्रतिबंधित ब्लड-बूस्टर रॉक्साडस्टॅटसाठीची चाचणी सकारात्मक आल्यानंतर ऑक्टोबर, 2022 पासून तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या वेळी प्रतिबंधित पदार्थ रॉक्साडस्टॅटसाठीची चाचणी ही स्पर्धेदरम्यान नियमित मूत्र चाचणीद्वारे करण्यात आली होती. हॅलेपने बंदी घातलेला पदार्थ जाणूनबुजून घेतल्याचा ठामपणे इन्कार केला आहे. परवानाधारक सप्लिमेंट, जे दूषित झाले होते, त्यातून आपल्या शरीरात अॅनिमियावरील औषधाचे थोडे अंश गेले आणि हे दाखवण्यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत असे तिने सांगितले होते.
लवादाने हालेपचा दूषित सप्लिमेंट घेतले होते हा युक्तिवाद स्वीकारला. परंतु जर ते प्रमाण इतके कमी असते, तर सकारात्मक आलेल्या चाचणीत ‘रॉक्साडस्टॅट’ अशा प्रकारे सापडले नसते, असे त्यांचे मत बनले. दुसरा ठपका हा हालेपच्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्टमधील गैरप्रकारांशी संबंधित आहे.









