इंस्टाग्रामवर रील बनवल्याचा राग अनावर : घरातच रिव्हॉल्व्हरने तीन गोळ्या झाडल्या
वृत्तसंस्था/गुरुग्राम
हरियाणामधील टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्याने देशभर खळबळ निर्माण झाली आहे. गुरुग्राममधील आपल्या घरातच राधिकाची हत्या करण्यात आली. राधिकावर तिच्या वडिलांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात, इंस्टाग्रामवर रील बनवल्याचा राग अनावर झाल्याने वडिलांनी घरी परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राधिकाचे वडील तिच्या रील बनवण्याच्या सवयीमुळे खूप रागावले होते. राधिका रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करायची, असे गुरुग्राम पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या प्रकरणावरून राधिकाच्या वडिलांनी आपल्या मुलीवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी राधिकाच्या वडिलांना अटक केली आहे. यासोबतच, पोलिसांनी गोळीबारासाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले आहे.
राधिका यादव ही 25 वर्षांची टेनिसपटू असून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनमध्ये राधिकाचे दुहेरी टेनिसपटूमध्ये 113 वे स्थान होते. आयटीएफ दुहेरीत राधिकाचे हे सर्वोत्तम स्थान होते. तिचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता. ती देशाची उदयोन्मुख खेळाडू होती, परंतु तिच्या वडिलांनी स्वत:च आपल्या मुलीची हत्या केली. राधिका यादवची टेनिसमधील कामगिरी बहरात येत असतानाच तिचा जीवन प्रवास संपला. राधिकाच्या हत्येने सर्वांना धक्का बसला आहे.









