वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
टेनिस स्टार कोको गॉफने पारंपरिकदृष्ट्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांची राहिलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील स्पर्धात्मक टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ‘यूएनसीएफ’ला 1 लाख डॉलर्स दान केले आहेत. ‘यूएनसीएफ’ मंगळवारी जाहीर झालेल्या कोको गॉफ शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे व्यवस्थापन करेल.
‘माझ्या कुटुंबाचा अशा महाविद्यालयांशी व विद्यापीठांशी निगडीत इतिहास मोठा आहे, जो माझ्या पणजोबांपासून सुरू होतो. काकी आणि काकांपासून चुलत भावांपर्यंत कित्येकांना घडविण्यात अशा शिक्षणसंस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे गॉफने सांगितले. टेनिसमध्ये विद्यार्थी-खेळाडूंसाठी संधी निर्माण करण्यात ‘यूएनसीएफ’ला ला पाठिंबा देणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एक तऊण कृष्णवर्णीय खेळाडू या नात्याने माझ्यासारखे दिसणारे लोक खेळ आणि शिक्षण या दोन्हीमध्ये प्रगती करत असताना पाहणे किती प्रभावी आहे हे मला समजते, असे तिने म्हटले आहे.
फ्लोरिडाच्या 20 वर्षीय गॉफ हिने 2023 ची अमेरिकन ओपन एकेरी स्पर्धा आणि 2024 ची फ्रेंच ओपन महिला दुहेरी स्पर्धा जिंकलेली आहे. ती सध्या जागतिक टेनिस संघटनेच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.









