वार्ताहर कुडाळ
तेंडोली – माड्येवाडी येथील रस्ता दुरुस्तीच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.तेथील रस्त्यावरील खड्डे ब्रेकर मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्यात आले. हा रस्ता दुरुस्तीसाठी युवा सेना विभाग प्रमुख व तेंडोली ग्रा. प. सदस्य कौशल राऊळ यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती कामाला आजपासून सुरुवात झाली.
तेंडोली – माड्येवाडी रस्ता दीड – दोन किलोमीटर आहे. या वाडीत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरुन नेहमीच पादचारी, शाळकरी मुले, वाहन धारकांना कसरत करावी लागत होती. मात्र आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने ब्रेकर व जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता दुरुस्त करण्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.यावेळी उपसरपंच संदेश प्रभू, युवा नेते मितेश वालावलकर, धोंडी खानोलकर, सागर खानोलकर, प्रवीण गावडे, निलेश गावडे, प्रवीण खानोलकर,निलेश राऊळ, सदानंद खानोलकर, रघुनाथ खानोलकर आदी उपस्थित होते.









